देऊळगाव राजा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा, देऊळगाव राजा येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने बैल सजवून तान्हा पोळ्याचा पारंपरिक उत्सव साजरा केला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध आकर्षक बैलांच्या प्रतिकृती व सजावटीने कार्यक्रमाचे विशेष आकर्षण वाढले.
तान्हा पोळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या मातीशी, संस्कृतीशी व परंपरांशी जोडणारा सामाजिक संदेश देण्यात आला. तसेच “झाडे लावा, झाडे जगवा”, “पर्यावरणाचे रक्षण करा” आणि “प्राणीमात्रांवर दया करा” असे पर्यावरणपूरक व संवेदनशील संदेश विद्यार्थ्यांनी दिले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, पालक तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
परंपरेचे जतन, पर्यावरणाचे संवर्धन आणि प्राणीमात्रांप्रती प्रेम—यांचा सुंदर संगम या तान्हा पोळा उत्सवातून पाहायला मिळाला.



