ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बैलपोळा उत्सव विदर्भातील महाउत्सव म्हणून नावारुपास येईल – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

 बैल पोळा उत्सव व कृषि प्रदर्शनी ;  शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देणाऱ्या बैलाची संस्कृती जपणारा सण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांसोबत त्यांची बैलजोडी देखील अहोरात्र मेहनत घेत असते. अशा बैलजोडीची जाण खऱ्या अर्थाने राजमाता जिजाऊ यांनी जपली होती. त्याच संस्कृतीची जाण ठेऊन विदर्भात मोठ्या प्रमाणावर बैल पोळा उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव विदर्भातील महाउत्सव म्हणून नावारुपास येईल, असे सार्जनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी सांगितले.

शहिद भगतसिंग व्यायाम शाळा व रामनगर बैल पोळा उत्सव समितीच्यावतीने बैल पोळा व कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, कृषि राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गाते, संतोष ठाकूर, शुभांगी कोलते, वंदना भुते, निलेश किटे, बैल पोळा समितीचे अध्यक्ष नरेश गुजर आदी उपस्थित होते.

बैलपोळा सण हा उत्सवाच्या स्वरुपात साजरा होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. शेतकरी हा अहोरात्र शेतात राबतो. बरोबरीने त्यांची बैलजोडी सुध्दा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राबत असते. अशा बैलजोडीचे महत्व बैलपोळ्या माध्यमातून जपण्याचे कार्य विदर्भात होत आहे. या बैल पोळ्याचे महत्व पुढील पिढीने जाणले पाहिजे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासन शेतकरी हिताच्या विविध योजना राबवित असल्याचे यावेळी शिवेंद्रसिंह भोसले यांनी सांगितले. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केलेल्या मागणीनुसार शिवाजी महाराज पुतळा चौक परिसर सौदर्यीकरणासाठी 10 कोटी रुपये लवकरच मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

*बैलपोळ्यातून शेतकऱ्यांच्या संस्कृतीचे संवर्धन : डॉ.पंकज भोयर*

शेतकऱ्यांची सांस्कृतिक परंपरा कायम ठेवण्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर बैलपोळा उत्सव साजरा केला जात आहे. बैलजोड्या शेतात राबराब राबून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत करतात. त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. भविष्यात कृषी प्रदर्शनी मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी कृषि विभागाने प्रयत्न करावे. राज्यातील अडचणी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी शासनानी केली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील 33 हजार शेतकऱ्यांना झाला असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.

*शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना : ॲड.आशिष जयस्वाल*

राज्य शासन शेतकरी हिताच्या विविध योजना राबवित आहे. शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लॉटरी पद्धत बंद करण्यात आली. महिला शेतकरी सन्मान योजना सुरु करण्यात आली. गोपीनाथ मुंडे सानुग्रह योजनेतून राज्यातील 2 कोटी महिलांना लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. बळीराजा शेत पांदनरस्ता योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरली आहे. पुढील 20 वर्षात शेतकरी कसा समृध्द होईल, याचा रोडमॅप तयार करण्यात आला असल्याचे राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल म्हणाले.

यावेळी सुधीर पांगुळ व संजय गाते यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. तत्पुर्वी मान्यवरांच्याहस्ते कृषि प्रदर्शनीचे फित कापून तसेच बैल जोडीची पूजा करुन बैल पोळ्याचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये