नवोदित डॉक्टरांनी सेवाभाव, नैतिकता आणि संवेदनशीलतेने रुग्णसेवा करावी – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचा फाउंडेशन डे ; सन 2020 एमबीबीएस बॅचचा ग्रॅज्युएशन सेरेमनी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
ही कोरोनाची नव्हे, कोरोना योद्ध्यांची बॅच
वर्धा : महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सेवाग्राम ही संस्था केवळ वर्धा जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. 2020 एमबीबीएस बॅचच्या नवोदित डॉक्टरांनी संस्थेने दिलेले शिक्षण, संस्कार आणि सेवाभावाची परंपरा पुढे नेऊन समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये आयोजित फाउंडेशन डे तसेच ग्रॅज्युएशन सेरेमनी एमबीबीएस बॅच 2020 कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सचिव डॉ.बी.एस.गर्ग, डीन डॉ.ए.के.शुक्ला, डॉ.पुनम शिवकुमार, डॉ.सतीश कुमार यांच्यासह डॉक्टर, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक व नातेवाईक उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या अत्यंत आव्हानात्मक काळात वैद्यकीय शिक्षणास सुरुवात केलेल्या 2020 च्या एमबीबीएस बॅचने प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, आत्मविश्वास आणि सेवाभाव जपला. त्यामुळे या बॅचला केवळ ‘कोरोनाची बॅच’ न म्हणता ‘कोरोना योद्ध्यांची बॅच’ म्हणून ओळखले पाहिजे, असे गौरवोद्गार पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी काढले. नवोदित डॉक्टरांना संस्थेने दिलेला साधेपणा, शालीनता, नैतिक मूल्ये आणि सेवाभाव जपण्याचे आवाहन केले. या संस्थेतून मिळालेले संस्कार समाजातील गरजू आणि वंचित घटकांच्या सेवेसाठी वापरावेत, असे ते म्हणाले.
नवोदित डॉक्टरांचे अभिनंदन करतांना एमजीआयएमएससोबतच्या आपल्या कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला. सेवाभावी उद्देशाने 1969 मध्ये सुरू झालेल्या या संस्थेने आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून, आजही ही सेवापरंपरा अखंडपणे सुरू आहे. शहरांबरोबरच ग्रामीण आणि दुर्गम भागातील सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हेच खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्थेचे यश असल्याचे डॉ.भोयर यांनी सांगितले.
देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून एमबीबीएस आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. देशातील एम्सची संख्याही वाढली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारतच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर कॅशलेस आरोग्यसेवा उपलब्ध होत असून, कर्करोग तपासणी व उपचारासाठीही विशेष प्रयत्न केले जात असल्याचे डॉ.भोयर यांनी सांगितले.
डॉ.बी.एस.गर्ग म्हणाले, विद्यार्थी आता संवेदनशील डॉक्टर म्हणून समाजात प्रवेश करीत असून, रुग्णांशी सहानुभूतीने वागणे आवश्यक आहे. गरीब, महिला, मुले, वृद्ध, दिव्यांग आणि उपेक्षित घटकांवर उपचार करताना अनुकंपा, कौशल्य आणि माणुसकी जपावी, असे सांगितले. डीन डॉ.ए.के.शुक्ला येथील विद्यार्थी कुठेही कार्यरत राहिले तरी एमजीआयएमएसचे रुग्णदूत राहतील. संस्थेचे शिक्षण व संस्कार सदैव सोबत ठेवावेत. पालकांचा त्याग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांची जाणीव ठेवून गरजू रुग्णांच्या सेवेसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा, असे सांगितले.
यावेळी डॉ.कांचन यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा तर डॉ.पुनम शिवकुमार यांनी कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष पी. एल. तापडिया यांचा शुभेच्छा संदेश उपस्थितांना वाचून दाखविला. यावेळी मान्यवरांच्याहस्ते विद्यार्थ्यांना एमबीबीएस पदवीचे वितरण करण्यात आले. तसेच नवोदित डॉक्टरांना डॉक्टर प्रतिज्ञा देण्यात आली.



