ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस मुख्यालय, वर्धा येथे दामिनी पथक वाहन हस्तांतरण सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महिला व मुलींच्या सुरक्षेला अधिक प्रभावीपणे प्राधान्य देण्यासाठी तसेच महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देऊन आवश्यक ती पोलीस मदत उपलब्ध करून देण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे दामिनी पथकाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. याच उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा नियोजन समिती वर्धा यांचे सहकार्यातून वर्धा जिल्हा पोलीस दलातील दामिनी पथकांना पुरविण्यात आलेल्या 25 TVS Jupiter दुचाकी वाहनांचा हस्तांतरण सोहळा आज दिनांक 10/09/2026 रोजी मा. श्रीमती वान्मथी सी. जिल्हाधिकारी, वर्धा यांचे हस्ते पोलीस मुख्यालय वर्धा येथील कवायत मैदानात संपन्न झाला.

महिला सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी गस्त वाढविणे, शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा, बसस्थानके, सार्वजनिक ठिकाणे तसेच महिलांची वर्दळ असलेल्या परिसरात निवमित भेटी देणे आणि महिलांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेणे यासाठी सदर 25 दुचाकी वाहनांपैकी पोलीस स्टेशन वर्धा शहर, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव या पोलीस स्टेशनला प्रत्येकी 02 दुचाकी व उर्वरीत पोलीस स्टेशनला प्रत्येकी 01 दुचाकी, पोलीस अधीक्षक कार्यालय येथील दामिनी पथकास 02 दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वाहनाच्या माध्यमातून दामिनी पथकास आवश्यक त्या ठिकाणी जलदगतीने पोहोचणे, महिला व मुलींशी संवाद साधणे, प्राप्त तक्रारीची तात्काळ दखल घेणे, छेडछाड अथवा महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घटनांवर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करणे शक्य होणार आहे.

दामिनी पथकाच्या माध्यमातून महिला सुरक्षेबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक गस्त आणि तक्रारींना त्वरित प्रतिसाद यावर विशेष भर देण्यात येणार असून, महिला व मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी वर्षा पोलीस दल सातत्याने कार्यरत आहे. तसेच सदर कार्यक्रमात महिला व मुलीना कायदेशीर हक्क, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी आदींबाबत मा. श्रीमती वान्मथी सी. जिल्हाधिकारी वर्धा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

“महिलांची सुरक्षा ही केवळ पोलीस दलाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. महिलांनी कोणत्याही प्रकारच्या त्रासाला घाबरून न जाता तात्काळ दामिनी पथक हेल्पलाईन क्रमांक 7620520025 व पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा.” असे आवाहन श्री. सौरभकुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा यांनी त्यांचे मनोगतात केले आहे.

वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या या उपक्रमामुळे महिला सुरक्षेच्या उपाययोजनांना अधिक गतिमानता प्राप्त होऊन ‘सुरक्षित महिला – सुरक्षित समाज’ या उद्दिष्टाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

सदरचा कार्यक्रमास श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, श्रीमती शोभिका पाठक, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी, वर्धा, श्रीमती स्नेहा मेंढे, उपप्रादेशिक परीवहन अधिकारी, वर्धा, श्रीमती तृप्ती चव्हाण, महिला व बाल विकास अधिकारी, वर्धा, तसेच वर्धा जिल्ह्यातील सर्व महिला पोलीस अधिकारी, महिला पोलीस अंमलदार तसेच महाविद्यालयातील प्राध्यापिका व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती वंदना कारखेले, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव यांनी केले असुन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती माधुरी वाघाडे, प्रमुख दामिनी पथक यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये