विना परवानगी चार झाडांची कटाई : कंत्राटदाराला ५० हजारांचा दंड
ईको. प्रो. च्या पाठपुराव्याला यश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नगर परिषद क्षेत्रातील विंजासन रोडवर विना परवानगी तीन कडुलिंबाची व एका करंजीच्या झाडाची कटाई केल्याप्रकरणी नगर परिषद भद्रावतीने संबंधित कंत्राटदारावर कारवाई केली आहे. वृक्ष संवर्धन समितीच्या ठरावानुसार संबंधित कंत्राटदाराला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, भरपाई म्हणून १०० झाडे टिगार्डसह लावून त्यांचे संगोपन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नगर परिषद भद्रावतीच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी ताजुद्दीन टिंबर मार्टचे ताजुद्दीन मस्तान शेख यांना यासंदर्भात नोटीस बजावली आहे. नगर परिषद क्षेत्रातील झाडांच्या फांद्या व झाडे कटाई करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराची निविदा मंजूर असली तरी, प्रत्येक कामासाठी नगर परिषदेची अनुमती व कार्यादेश आवश्यक असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
*ईको. प्रो.च्या तक्रारीनंतर कारवाईसाठी सातत्याने पाठपुरावा*
विंजासन रोडवरील वृक्ष कटाईची बाब समोर आल्यानंतर स्थानिक ईको. प्रो. संघटनेच्या वतीने यासंदर्भात नगर परिषदेकडे तक्रार करण्यात आली होती. विना परवानगी झाडांची कटाई करणाऱ्या जबाबदार घटकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ईको. प्रो.च्या वतीने सातत्याने करण्यात आली होती. यासाठी संबंधित प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर नगर परिषदेने संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करत १०० झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत.
*विना सूचना व कार्यादेश चार झाडांची कटाई*
नगर परिषदेच्या माहितीनुसार, दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी विंजासन रोडवरील तीन कडुलिंबाची व एका करंजीची अशी एकूण चार झाडे नगर परिषदेला कोणतीही सूचना न देता तसेच कार्यादेश प्राप्त करून न घेता तोडण्यात आली. ही कृती महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ अन्वये नियमबाह्य असल्याचे नगर परिषदेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, त्याच परिसरातील पिंपळाच्या झाडाची रस्त्यावर झुकलेली व धोकादायक फांदी छाटण्यात आली होती. या फांदीमुळे शाळेच्या बसेस तसेच इतर वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. पावसाळ्यात किंवा वादळामुळे फांदी कोसळून अपघात अथवा नुकसान होण्याची शक्यता असल्याने तिची छाटणी करण्यास हरकत नसल्याचे नगर परिषदेने स्पष्ट केले आहे.
*१०० झाडे टिगार्डसह लावण्याचे आदेश*
वृक्ष संवर्धन समितीच्या दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या ठरावानुसार, विना परवानगी तोडलेल्या चार झाडांच्या भरपाईसाठी कडुलिंब, करंजी तसेच इतर चांगल्या प्रजातीची १०० झाडे टिगार्डसह नगर परिषदेने निश्चित केलेल्या जागेवर लावून त्यांचे संगोपन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या संबंधित परिपत्रकानुसार ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. हा दंड सात दिवसांच्या आत नगर परिषद कार्यालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
*बिलातून रक्कम वसुल करण्याचा इशारा*
निर्धारित मुदतीत १०० झाडे व टिगार्डसह वृक्षारोपण न केल्यास त्यासाठी लागणारा खर्च तसेच ५० हजार रुपयांचा दंड संबंधित कंत्राटदाराच्या नगर परिषद क्षेत्रातील झाडांच्या फांद्या छाटणीच्या देयकातून कपात करून वसूल करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमधून देण्यात आला आहे. पुढील शासकीय कारवाईस संबंधित कंत्राटदार स्वतः जबाबदार राहील, असे नगर परिषदेने स्पष्ट केले आहे.
या कारवाईची प्रत अध्यक्ष तथा वृक्ष संवर्धन समिती सभापती, नगर परिषद भद्रावती तसेच भद्रावती ईको. प्रो. यांना माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.



