ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

जिवती तहसीलदारांमार्फत मागण्यांचे निवेदन; ‘प्लॅन बी’सह विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण लागू करण्यासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, जिवती तालुक्याच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार, जिवती यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.

धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी, ही निवेदनातील प्रमुख मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या विशेष अनुमती याचिकेच्या पार्श्वभूमीवर शासनाने धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ ठोस, सकारात्मक आणि कायदेशीर बाबी स्पष्ट करणारे प्रभावी प्रतिज्ञापत्र दाखल करावे. तसेच या प्रकरणात समाजाची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी अनुभवी वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

एसटी आरक्षणाबाबत कोणताही प्रतिकूल निर्णय झाल्यास धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने ‘प्लॅन बी’ तयार ठेवावा, अशी महत्त्वपूर्ण मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

यासोबतच श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा, देवस्थानच्या विश्वस्त मंडळात किमान २१ विश्वस्तांची नियुक्ती करावी आणि अध्यक्षपद धनगर समाजातील व्यक्तीस द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ला स्वातंत्र्यवीर शिंग्राबा धनगर यांचे नाव द्यावे, तर मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.

धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाने या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय धनगर रक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तिरुपती पोले, उपाध्यक्ष शिवाजी श्रीरामे, ज्येष्ठ नेते माधव डोईफोडे, नागोराव देवकते, नागनाथ बोरुळे, गोविंद गोरे, राम आमनर, सूरज शेंडगे, बालाजी करले, नामदेव सलगर, रामेश्वर देवकते, परमेश्वर देवकते, खंडुजी सलगर, आकाश माने, माधव फुगनर, शंकर देवकते, मालू पोले, बालाजी पांढरे, कृष्णा पोले, बालाजी बोळगीर, सिद्धेश्वर सलगर यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये