ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिपक गोतावळे यांना ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे जि. प. उच्च प्राथमिक शाळा, टेकामांडवा येथील विषय शिक्षक दिपक अर्जुनराव गोतावळे यांना जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने सन २०२६ चा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश पाताळे तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी आश्विनी सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपक गोतावळे यांचा सन्मान करण्यात आला.

दिपक गोतावळे यांनी टेकामांडवा येथील जिल्हा परिषद शाळेत विषय शिक्षक म्हणून कार्यरत असताना शैक्षणिक गुणवत्तावाढीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. डिजिटल शिक्षण, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, स्पर्धा परीक्षांची तयारी यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना दिली.

कोरोना काळात लोकवर्गणीतून शाळेचा कायापालट करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय ठरले. त्यांच्या मार्गदर्शनातून शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच SQAAF मूल्यांकनात शाळेला ‘अ+’ श्रेणी प्राप्त झाली. शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेतही शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेची विद्यार्थी पटसंख्याही वाढली आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेने त्यांची ‘जिल्हा आदर्श शिक्षक’ पुरस्कारासाठी निवड केली.

दिपक गोतावळे यांना मिळालेल्या या सन्मानामुळे जिवती तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, सहकारी शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये