राष्ट्रीय महामार्गावरील खड्डा बुजवून वाहतूक केली सुरक्षित
गोंडपिपरी पोलिसांची सामाजिक बांधिलकी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यदक्षतेचा आदर्श घालून देत गोंडपिपरी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक खड्डा स्वतः बुजवून वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
रासबिहारी कॉटन जीनिंगजवळील चंद्रपूर-अहेरी मार्गावरील राष्ट्रीय महामार्गावर मोठा खड्डा पडल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांसाठी हा खड्डा धोकादायक ठरत होता.
ही बाब लक्षात येताच गोंडपिपरी पोलिस स्टेशनच्या अमलदारांनी तत्परता दाखवत स्वतः घटनास्थळी जाऊन खड्डा बुजविण्याचे काम हाती घेतले. पोलिस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील खड्डा भरून वाहतुकीसाठी मार्ग सुरक्षित केला. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे प्रवाशांना व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही पोलिस तत्पर असल्याचे या उपक्रमातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या संभाव्य अपघातांना आळा घालण्यासाठी गोंडपिपरी पोलिसांनी घेतलेल्या या पुढाकाराचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
वाहतूक सुरक्षा आणि नागरिकांची सुरक्षितता यांना प्राधान्य देत गोंडपिपरी पोलिसांनी केलेले हे कार्य खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.



