कारच्या धडकेत ऑटो उलटल्याने सासूचा मृत्यू तर जावई गंभीर जखमी
चंद्रपूर - नागपूर महामार्गावरील कोंढाणाला लगत असलेल्या कडोली फाट्या जवळील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
मुलीकडे पंधरा दिवस घालवल्यानंतर जावयाच्या ऑटोने घराकडे परतणाऱ्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर काळाने घाला घातला. अज्ञात कारच्या धडकेत ऑटो उलटल्याने सासूचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. तर जावई गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात भद्रावती कोंढा फाटा मार्गावरील कोंढाणाल्या जवळील कडोली गावाजवळ सायं. ६ वाजताचे सुमारास घडला.
सिंधू सदाशिव आगलावे वय ७५ वर्षे राहणार पाटाळा असे मृत महिलेचे नाव आहे तर त्यांचे जावई जिवा वारलुजी गौरकार वय ४४ वर्षे रा. खैरगांव- उर्जानगर हे जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे उपचार सुरु आहे.
सिंधू आगलावे या खैरगाव-ऊर्जानगर येथे आपल्या मुलीकडे गेल्या होत्या. त्यांचा पंधरा दिवसाचा मुक्काम संपल्यानंतर सोमवार सायंकाळी त्या त्यांचा जावई जीवा गौरकार यांचा ऑटो क्र. एम एच ३४ बी एच ६२६१ ने पाटाळा येथील आपल्या घरी परतत होत्या. कोंडा नाल्याजवळ मागून आलेल्या एका अज्ञात कारणे ऑटोला अचानक जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की ऑटो चालकाचा ताबा सुटून ऑटो रस्त्यावरच पलटी झाला.
या दुर्घटनेत गंभीर दुखापत झाल्याने सिंधू आगलावे यांचा जागीच मृत्यू झाला तर जावई जिवा गौरकार हे जखमी झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला. पळून गेलेल्या कारचालकाचा शोध भद्रावती पोलीस करीत आहे.



