ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पशुवैद्यकांनाच संस्थाप्रमुखाचा कार्यभार द्या : पुनर्रचनेतील तरतुदी लागू करण्याची मागणी

पशुचिकित्सा व्यवसायी संघटना आक्रमक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

           पशुसंवर्धन विभागाच्या १० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या पुनर्रचनेनुसार पात्र आणि नोंदणीकृत पशुवैद्यकांनाच संबंधित पशुवैद्यकीय संस्थेचा संस्थाप्रमुख म्हणून कार्यभार द्यावा, या मागणीसाठी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने असहकार आंदोलन सुरू केले आहे. शासन आणि प्रशासनाकडून या मागणीची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

पशुवैद्यकीय सेवा ही पशुधनाचे आरोग्य, पशुपालकांचे हित आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेली महत्त्वाची सेवा आहे. त्यामुळे संस्थाप्रमुखाची जबाबदारी देताना संबंधित पशुवैद्यकांची शैक्षणिक पात्रता, तांत्रिक ज्ञान आणि अनुभव यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. पात्र नोंदणीकृत पशुवैद्यकांना डावलून इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांकडे संस्थाप्रमुखाचा कार्यभार दिल्यास पशुवैद्यकीय सेवांची गुणवत्ता, तांत्रिक निर्णयक्षमता आणि प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ शकतो, असे संघटनेने म्हटले आहे.

१० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या पुनर्रचनेतील तरतुदी तातडीने लागू करून पात्र नोंदणीकृत पशुवैद्यकांना संबंधित पशुवैद्यकीय संस्थांचा संस्थाप्रमुखाचा कार्यभार द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांचाही शासनाने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मागण्यांकडे असेच दुर्लक्ष होत राहिल्यास असहकार आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. शासनाने लवकरात लवकर सकारात्मक आणि न्याय्य निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

यावेळी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दत्ता नन्नावरे आणि सचिव डॉ. सुनील अ. लाम यांनी शासनाच्या भूमिकेविरोधात नाराजी व्यक्त केली. पात्र पशुवैद्यकांच्या हक्कांसाठी संघटना ठामपणे लढत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये