ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी वर्गाचा ८ सप्टेंबरला ब्रह्मपुरीत जनआक्रोश महामोर्चा..!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी : महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, कामगार, जबरनजोत धारक, महिला, विद्यार्थी, युवक, बेरोजगार तसेच संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील निराधारांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी ब्रह्मपुरीत जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महामोर्चाची सुरुवात हुतात्मा स्मारक, वडसा रोड, ब्रह्मपुरी येथून सकाळी ११ वाजता होणार असून, मोर्चा ब्रह्मपुरी उपविभागीय कार्यालयावर धडकणार आहे. ‘दे धडक बैलगाडी, ट्रॅक्टर’ अशा घोषवाक्यासह अमरावतीचे क्रांतिकारी लोक शाहीर कॉ.धम्मा खडसे व गडचिरोलीचे लोक शाहीर विजयभाऊ शेंडे यांच्या महा जलसा कार्यक्रमातून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते कॉम्रेड विनोद झोडगे पाटील यांनी पत्रकातून सांगितले आहे.

मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणे, कर्जमाफी करणे, संन २०२५-२६ ची शेतकऱ्यांची हेक्टरी १० हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम तात्काळ देणे, नियमित वीजपुरवठा करून शेतकऱ्यांना प्रस्तावित २ हजार रुपयांचे अनुदान तातडीने देणे आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ देणे यांचा समावेश आहे.

तसेच जबरनजोत धारकांना जमिनीचे पट्टे व घराचे पट्टे देणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया प्रस्तावित समृद्धी महामार्ग रद्द करणे, सर्व नोंदणी गट महिला व बँकिंगसाठी तसेच महिलांना कर्जमाफीचा लाभ देणे, गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याचे पाणी ब्रह्मपुरी विभागातील सर्व शेतकऱ्यांना देणे आणि स्मार्ट मीटर लावणे बंद करून लावलेले स्मार्ट मीटर काढून घेणे या मागण्याही करण्यात आल्या आहेत.

याशिवाय शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरची १.२५ लाख रुपयांची सबसिडी देणे, शेतकऱ्यांचा लागणारा डिझेल टँकर फी करणे, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे, हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत देणे, रासायनिक खते व कीटकनाशकांचे दर कमी करणे तसेच संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन तात्काळ देणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

या महामोर्चात शेतकरी, शेतमजूर, कामगार, युवक, महिला, विद्यार्थी, बेरोजगार, जबरनजोत धारक व विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट राज्य किसान सभेचे राज्य कौन्सिल सदक्ष तथा जिल्हा सचिव कॉम्रेड विनोद झोडगे व आयोजकांनी केले आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरीत प्रशासनाचे लक्ष आता या मागण्यांकडे लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये