निपुण अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालडोह शाळेचा गौरव
१०० टक्के निपुणतेची उल्लेखनीय कामगिरी; शिक्षक दिनी मुख्याध्यापकांसह शिक्षकांचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- महाराष्ट्र शासनाच्या निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकास उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषद हायस्कूल, पालडोह या शाळेचा शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर २०२६ रोजी गौरव करण्यात आला. शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये शाळेने १०० टक्के निपुणतेचे उद्दिष्ट साध्य करून जिल्ह्यात आपल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण आणि ३६५ दिवस शैक्षणिक उपक्रम राबविणारी शाळा म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल, पालडोहची ओळख आहे. शिक्षक राजेंद्र उदेभान परतेकी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यात या उपक्रमांचा मोठा वाटा आहे.
शाळेची सुरुवात सकाळी ९ वाजता होते. सकाळी ९ ते १० या वेळेत विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच गणित, मराठी आणि इंग्रजी विषयांचे पूरक मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या या अभिनव पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विषयाची आवड, आत्मविश्वास आणि शिकण्याची क्षमता वाढण्यास मोठी मदत झाली. याच सातत्यपूर्ण प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम निपुण अभियानाच्या कामगिरीत दिसून आला.
महाराष्ट्र शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये पालडोह शाळेने नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक क्षमता विकसित करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. त्याची दखल घेत शाळेला अभिनंदनासह प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या गौरव सोहळ्यात शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र दिगदेवतुलवार तसेच शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी सातत्याने उल्लेखनीय योगदान देणारे शिक्षक राजेंद्र परतेकी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश पातळे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
पालडोह शाळेला निपुणतेचा हा मान मिळवून देण्यासाठी शिक्षक राजेंद्र परतेकी, सुनील आडे, सतीश गाकरे, विनोद खवशी, निकिता इंझळकर, महेश शेंडे, प्रफुल्ल ढेंगेकर, प्रशांत कोटनाके, कुंडगीर, तसेच शिक्षणप्रेमी गणपत धुळगुंडे आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
सातत्यपूर्ण प्रयत्न, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शिक्षक-विद्यार्थ्यांच्या सामूहिक सहभागातून पालडोह शाळेने मिळविलेला हा गौरव ग्रामीण भागातील शाळांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.



