निरपेक्ष कीर्तन सेवेच्या तालुकाध्यक्षपदी ह.भ.प. नागनाथ महाराज तोगरे
समाजप्रबोधन आणि वारकरी परंपरेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा आणि समाजप्रबोधनाचे कार्य गावागावात पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या जिवती तालुकाध्यक्षपदी ह.भ.प. नागनाथ महाराज तोगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निरपेक्ष कीर्तन सेवा संस्था कीर्तन, प्रवचन, आध्यात्मिक प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात सदाचार, संस्कार आणि सामाजिक एकोपा रुजविण्याचे कार्य करते. या कार्याला जिवती तालुक्यात अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी तोगरे महाराज यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कीर्तन हे केवळ धार्मिक माध्यम नसून समाजाला विवेक, नैतिकता आणि माणुसकीची दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. संत विचार, अभंग, भारुडांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा आणि संस्कारक्षम समाज निर्मिती करणे, तसेच युवा पिढीला सकारात्मक दिशा देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
तोगरे महाराज यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील कीर्तनकार, वारकरी, भजनी मंडळे आणि अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र येऊन प्रबोधनात्मक चळवळ अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निरपेक्ष कीर्तन सेवेचा विस्तार गावागावात होऊन संत विचारांचा संदेश घराघरात पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



