रानडुकरांच्या उपद्रवामुळे पिकांचे नुकसान!
शेतकरी संकटात ; नुकसानग्रस्त शेतांची तातडीने पाहणी व पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील हिरापूर-खडकी परिसरात रानडुकरांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हिरापूर-खडकी येथील शेतकरी अंकुश धुळगुंडे यांच्या कापूस पिकाच्या शेतात रानडुकरांनी धुडगूस घालत कापसाची झाडे उध्वस्त केली असून पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाल्याचे समोर आले आहे. परिसरातील अन्य शेतकऱ्यांच्या पिकांनाही रानडुकरांचा फटका बसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
सदर शेतीक्षेत्र साजा पाटण, वनपरिक्षेत्र विरुर व वनबीट चिखली यांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने संबंधित विभागांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भ अध्यक्ष, पत्रकार संरक्षण संघ महाराष्ट्र, शब्बीर जागीरदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे वन विभाग, पाटण साज्याचे पटवारी तसेच संबंधित कृषी सहाय्यक यांनी संयुक्तपणे नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून नियमानुसार पंचनामे करावेत, अशी मागणी केली आहे. तसेच शासनाच्या लागू नियमांनुसार पात्र शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
वन्यप्राण्यांकडून शेतीपिकांचे वारंवार नुकसान होत असल्याने वन विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन रानडुकरांचा बंदोबस्त व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. भविष्यात शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, अशी अपेक्षाही जागीरदार यांनी व्यक्त केली.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात यावा आणि शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाईची रक्कम विलंब न करता शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी व स्थानिकांकडून होत आहे.



