येरमी येसापूर शाळेत ‘वृक्षराखी’ उपक्रम उत्साहात
रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वृक्षांना बांधली राखी ; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- आनंददायी शनिवार व रक्षाबंधनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येरमी येसापूर येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून अनोखा ‘वृक्षराखी’ उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील वृक्षांना राखी बांधून त्यांच्या संरक्षण व संवर्धनाचा संकल्प केला.
वाढती वृक्षतोड, प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून महापूर, ग्लोबल वॉर्मिंग, अवकाळी पाऊस आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.
मुख्याध्यापक लिंगोराव सीताराम सोयाम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून ‘वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश दिला. रक्षाबंधनाच्या माध्यमातून केवळ मानवी नात्यांचे रक्षण न करता मानव आणि निसर्गातील अतूट नाते जपण्याचा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला.
यावेळी मुख्याध्यापक सोयाम म्हणाले, “रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून संरक्षणाची भावना जागृत करणारा सण आहे. प्राणवायू, सावली, पाऊस आणि जीवनाला आवश्यक पर्यावरणीय आधार देणाऱ्या वृक्षांचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून संरक्षणाचे नाते जोडले आहे. आजची ही छोटी कृती उद्याच्या पर्यावरण संवर्धनाची मोठी चळवळ ठरावी, हाच या उपक्रमामागील उद्देश आहे.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम, जाणीव, जबाबदारी आणि संवर्धनाची भावना निर्माण झाली.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत “झाडांचे संरक्षण करू, पर्यावरणाचे संवर्धन करू आणि भावी पिढीसाठी हिरवेगार भविष्य घडवू” असा संकल्प
केला.उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशव गोविंदराव कुमरे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच शाळेतील स्वयंपाकी भागुबाई कुमरे, अंगणवाडी मदतनीस सुशमा कुमरे आणि अंगणवाडी सेविका शिवकला येसांबरे यांनी सहकार्य केले.
वृक्षांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी दिलेला हा संदेश केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता वृक्षसंवर्धनाची सवय आणि पर्यावरणाप्रतीची जबाबदारी प्रत्येकाच्या मनात रुजवणारा ठरला.



