विदर्भ महाविद्यालयात ‘खेलो इंडिया संवाद’ व प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विदर्भ महाविद्यालय, जिवती येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलो इंडिया संवाद – खेल की बात पीएम के साथ’ या उपक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गंगाधर लांडगे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रीकांत पानघाटे, तर डॉ. योगेश खेडेकर व डॉ. सचिन यंगलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली.
डॉ. योगेश खेडेकर यांनी खेळांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व स्पष्ट करताना खेळामुळे शारीरिक सुदृढता, मानसिक आरोग्य तसेच नेतृत्वगुणांचा विकास होतो, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. गंगाधर लांडगे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. तसेच पंतप्रधानांच्या प्रेरणादायी विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी क्रीडा विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. डॉ. वैशाली डोरलीकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडाविषयक ज्ञानाचे प्रभावी प्रदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन डॉ. सचिन यंगलवार व प्रा. राहुल सदुलवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दोन्ही विभागांचे समन्वयक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



