जिवती येथे ‘वृक्ष राखी महोत्सव’ उत्साहात
आदिवासी बांधव-भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील महापांढरवाणी येथे आदिवासी बांधव-भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागातून ‘वृक्ष राखी महोत्सव’ मोठ्या उत्साहात पार पडला. निसर्गाशी असलेले अतूट नाते जपण्यासोबतच वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करून त्यांच्या संरक्षण व संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात गावातील बांधव-भगिनींनी आंब्याची पाने, विविध फुले आणि मोरपंख यांचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने आकर्षक राख्या तयार केल्या. त्यानंतर गावातील मोहाच्या झाडाला राखी बांधून ‘तुम्ही आमचे रक्षण करा, आम्ही तुमचे रक्षण करू’ असा भावनिक आणि पर्यावरणपूरक संकल्प करण्यात आला.
आदिवासी समाजाच्या जीवनात मोहाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उपजीविका, औषधी उपयोग तसेच दैनंदिन जीवनातील विविध गरजा पूर्ण करण्यात मोहाचे झाड महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे वृक्ष हे केवळ निसर्गाचा घटक नसून जीवन, संस्कृती आणि उपजीविकेचा अविभाज्य भाग आहेत, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
हा अभिनव उपक्रम आदरणीय लिंगोराव सोयाम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. पेसा अभ्यासक संतोष सलाम व शित्रुजी गेडाम यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावपाटील मानकु पाटील धुर्वे, सामाजिक कार्यकर्ते अनिल आढे, सीताराम आढे, तुकाराम धुरवे तसेच नैसर्गिक राखी तयार करण्यासाठी विशेष मेहनत घेणारे भगवान आढे यांनी परिश्रम घेतले.
महापांढरवाणी गावातील संपूर्ण बांधव-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला. वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या संरक्षण व संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्यात आल्याने हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श ठरला.
“वृक्ष आमचे रक्षण करतात; आता वृक्षांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे,” या प्रभावी संदेशाने ‘वृक्ष राखी महोत्सवा’ची सांगता झाली.



