ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिवरा गावातील तीन विद्यार्थ्यांची शिक्षकपदी निवड

जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक परंपरेला नवा मान ; गावात आनंदाचे वातावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील मौजा हिवरा गावाने शैक्षणिक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी नोंदविली आहे. हिवरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतलेल्या धीरज पुलगमकर, सुप्रिया पुलगमकर आणि स्नेहल हिवरकर या तीन विद्यार्थ्यांची शिक्षक भरती प्रक्रियेत निवड झाल्याने संपूर्ण हिवरा गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिवरा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर या तिन्ही विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. गोंडपिपरी येथील दलित मित्र डी.एड. महाविद्यालयातून शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर त्यांनी शिक्षकपदी निवड होण्याचे यश संपादन केले.

या तिघांची शिक्षकपदी झालेली निवड ही केवळ तीन विद्यार्थ्यांची वैयक्तिक कामगिरी नसून हिवरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि तेथील शिक्षकांच्या परिश्रमांची पावती असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हिवरा जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक परंपरा परिसरात विशेष ओळखली जाते. या शाळेतून शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी पुढे विविध क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहेत. त्यामुळे परिसरातील व आजूबाजूच्या गावांतील पालकही आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने हिवरा येथील शाळेकडे आकर्षित होत असल्याचे सांगण्यात येते.

धीरज पुलगमकर, सुप्रिया पुलगमकर आणि स्नेहल हिवरकर यांचे हे यश गावातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. परिस्थिती कोणतीही असली तरी मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर यश संपादन करता येते, हे या तिघांनी सिद्ध करून दाखवले आहे.

या यशामुळे हिवरा गावाचा शैक्षणिक मान आणखी उंचावला असून नवनियुक्त शिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक व सेवाभिमुख कार्यासाठी ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

आजचे हे यश उद्याच्या अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीप ठरावे आणि हिवरा गावातून भविष्यातही अनेक अधिकारी, कर्मचारी घडत राहावेत, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये