ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी ॲड. दत्तराज गायकवाड यांचे आमरण उपोषण सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण तातडीने लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी लोक स्वराज्य आंदोलनाचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. दत्तराज गायकवाड यांनी शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी जिवती तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली. उपोषणाचा हा पहिला दिवस असून, त्यांच्या आंदोलनाला मादगी व मातंग समाजासह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला.

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आपण मागील ३० ते ३५ वर्षांपासून सातत्याने संघर्ष करीत असल्याचे ॲड. गायकवाड यांनी सांगितले. या प्रदीर्घ आंदोलनाच्या काळात आपल्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले असले, तरी सामाजिक न्यायाच्या या लढ्यातून आपण माघार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

देशातील इतर काही राज्यांमध्ये अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण लागू करण्यात आले असताना महाराष्ट्रात मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप ॲड. गायकवाड यांनी केला. वंचित घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय्य प्रतिनिधित्व व हक्क मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनाच्या नेतृत्वात मादगी समाजाचे नेते हरिश्चंद्र नकलवार, समया पसूला, संजय कठाळे, अंकुश मोरे, जयराम पंडित, बबलू अक्केवार, विशाल गायमुखे, देविदास गायकांबळे, दत्ता भोगे, माधव सूर्यवंशी, तुकाराम कांबळे (गुज्जर), चरणदास केदासे, भागवत मोरे, रामा कुंटेवाड यांच्यासह मोठ्या संख्येने मादगी व मातंग समाजबांधव सहभागी झाले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये