ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडिलांकडून मिळाले राष्ट्रसंतांच्या विचारांचे संस्कार – आ. जोरगेवार

‘गाव तिथे राष्ट्रसंतांचा पुतळा’ संकल्पना; भजन-कीर्तनातून समाजप्रबोधनासाठी भजन मंडळांना प्रोत्साहन.

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचा माझ्यावर बालपणापासूनच प्रभाव आहे. माझे वडील गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यक्रमांना जात असत. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या विचारांचे संस्कार मिळाले. भजन-कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेणे गरजेचे असून, त्यासाठी भजन मंडळांना प्रोत्साहन देण्याचे काम आपण करत आहोत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम यांच्या वतीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय योगदानाची प्रेरणा देणाऱ्या ‘क्रांतीज्योती’चे शुक्रवारी चंद्रपूर शहरात आगमन झाले. यानिमित्त गांधी चौक येथील भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने क्रांतीज्योतीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित स्वागत सोहळ्यात आ. जोरगेवार बोलत होते.

यावेळी गुरुदेव सेवा समितीचे प्रचारक प्रमुख गोपाल कडू, कार्यकारिणी सदस्य रामदास देशमुख, नागपूर विभागीय सेवाधिकारी विठ्ठल सावकर, मध्यवर्ती प्रतिनिधी बाबाराव दोहतरे, केंद्रीय प्रचार विभाग सदस्य राजेंद्र गाडगे, जिल्हासेवाधिकारी हं.प. अशोक चरडे, अॅड. दत्ता हजारे, जिल्हा प्रचारक प्रमुख सुरेश चौथे, जिल्हा महिला सेवाधिकारी सुवर्णा पिंपळकर, महानगर सेवाधिकारी दादाजी नंदनावार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे समाजजागृती आणि राष्ट्रनिर्मितीचे महान कार्य करणारे युगपुरुष होते. त्यांनी भजन, कीर्तन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागवली. स्वच्छता, व्यसनमुक्ती, ग्रामविकास, शिक्षण, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक एकतेचा संदेश त्यांनी समाजाला दिला. त्यामुळे आजच्या काळातही राष्ट्रसंतांच्या विचारांची समाजाला मोठी गरज आहे.

राष्ट्रसंतांच्या विचारांशी असलेल्या आपल्या नात्याचा उल्लेख करताना आ. जोरगेवार म्हणाले की, माझे वडील गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यक्रमांना जात असत. त्यामुळे लहानपणापासूनच गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्याशी माझा संबंध आला. भजन, कीर्तन, सेवा आणि समाजप्रबोधनाचे संस्कार मला वडिलांकडून मिळाले. हेच संस्कार आजही समाजकार्य करताना प्रेरणा देतात.

राष्ट्रसंतांचे विचार आणि कार्य प्रत्येक गावापर्यंत पोहोचावे, नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, यासाठी ‘गाव तिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा’ ही संकल्पना आपण राबवत असल्याचे आ. जोरगेवार यांनी सांगितले. हा केवळ पुतळा उभारण्याचा उपक्रम नसून, त्या माध्यमातून राष्ट्रसंतांचे विचार आणि समाजप्रबोधनाची शिकवण गावागावात पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या काळात भजन-कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणे अधिक गरजेचे आहे. भजन मंडळांच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचा विचार, संतपरंपरेचा संदेश आणि सामाजिक प्रबोधनाची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे भजन मंडळांना प्रोत्साहन देण्याचे काम आपण करत आहोत. भजन मंडळांना सक्षम करणे म्हणजे समाजप्रबोधनाची परंपरा अधिक मजबूत करणे होय, असेही आ. जोरगेवार म्हणाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाला दिलेली विचारांची शिदोरी आजही तितकीच मौल्यवान आहे. त्यांच्या विचारांचे केवळ स्मरण न करता ते आपल्या आचरणात आणणे आवश्यक आहे. स्वच्छ, व्यसनमुक्त, संस्कारक्षम, एकसंघ आणि राष्ट्रभक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. ‘क्रांतीज्योती’च्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी पेटविलेली विचारांची ज्योत गावागावात आणि प्रत्येक घरात पोहोचविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन आ. जोरगेवार यांनी केले.

यावेळी उपस्थितांनी क्रांतीज्योतीचे उत्स्फूर्त स्वागत करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि ग्रामविकासाच्या कार्याला अभिवादन केले. कार्यक्रमामुळे गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये