सहा महिन्यांचा क्रीडांगण विकास दोन दिवसात भकास..!
STARS योजनेतील क्रीडांगण कामांवर संशयाची छाया ; शाळा समिती, बांधकाम विभाग अनभिज्ञ; शिक्षण विभागालाही माहिती नाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, चौकशीची पालकांची मागणी
ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या STARS (Strengthening Teaching-Learning and Results for States) योजनेअंतर्गत क्रीडांगण विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, गोंडपिपरी तालुक्यात या कामांच्या अंमलबजावणीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही शाळांमधील क्रीडांगणाची कामे अवघ्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्यात आल्याचा दावा असून, संबंधित कामांची माहिती शाळा समिती, बांधकाम विभाग तसेच शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांना नसल्याचे समोर आल्याने संशय अधिकच बळावला आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईमार्फत STARS योजनेंतर्गत तालुक्यातील सुमारे १०० ते ११० ग्रामीण शाळांची क्रीडांगण विकासासाठी निवड करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित कामांसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, कामांच्या देखरेखीची जबाबदारी नेमकी कोणाची, कामासाठी किती निधी मंजूर झाला आणि प्रत्यक्षात किती खर्च झाला, याबाबत स्पष्टता नसल्याने पालक व नागरिकांमध्ये नाराजी आहे.
काही ठिकाणी क्रीडांगण तयार करण्यासाठी करण्यात आलेल्या कामाचा दर्जा आणि त्यासाठी लागलेला कालावधी यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. सहा महिन्यांत पूर्ण होणारे काम अवघ्या काही दिवसांत कसे पूर्ण झाले? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, काम पूर्ण झाल्यानंतर काही शाळांच्या परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे क्रीडांगण विकासाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात दर्जेदार सुविधा मिळणार तरी कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
*अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियांमुळे संभ्रम*
या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांकडूनही परस्परविरोधी माहिती समोर येत असल्याचे दिसून येते. काही अधिकाऱ्यांनी कामाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले, तर काहींनी काम झाल्याचे मान्य केले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.
*कामांची गुणवत्ता तपासण्याची मागणी*
STARS योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सर्व क्रीडांगण कामांची प्रत्यक्ष पाहणी करावी, मंजूर निधी व खर्चाचा तपशील जाहीर करावा, कामाचा दर्जा तपासावा आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
क्रीडांगणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने आलेला निधी योग्य पद्धतीने खर्च झाला का? याचे उत्तर आता प्रशासनाला द्यावे लागणार असून, या प्रकरणाच्या चौकशीकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



