ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

म्हाडा कृती समितीच्या लाक्षणिक आंदोलनाला यश

रस्त्यावरील जुने टायर हटविण्यास सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

पडोली-कोसारा :- नवीन चंद्रपूर परिसरातील पडोली-कोसारा येथे रस्त्यावर तसेच मोकळ्या जागेत अवैधरित्या साठवून ठेवण्यात आलेले जुने टायर हटविण्याच्या मागणीसाठी म्हाडा कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या लाक्षणिक आंदोलनाला अखेर यश आले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन संबंधित टायर व्यावसायिकाने तातडीने टायर हटविण्यास सुरुवात केली असून, भविष्यात या ठिकाणी अशा प्रकारचा व्यवसाय करणार नसल्याची लेखी ग्वाही दिली आहे.

पडोली-कोसारा येथील आठवडी बाजाराच्या मार्गावर एका व्यावसायिकाने मोठ्या प्रमाणात जुने टायर रस्त्यालगत तसेच मोकळ्या जागेत साठवून ठेवले होते. त्यामुळे रहदारीचा मोठा रस्ता अरुंद झाला होता. या मार्गावर नागरिकांची सतत वर्दळ असते, तसेच याच ठिकाणी आठवडी बाजार भरत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

साठवून ठेवलेल्या जुन्या टायरमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने डासांची उत्पत्ती वाढली होती. परिणामी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. विशेष म्हणजे यापूर्वी याच टायरच्या साठ्याला उन्हाळ्यात आग लागली होती. नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच आग आटोक्यात आणण्यात आल्याने मोठी जीवित व वित्तहानी टळली होती. त्यानंतरही ग्रामस्थांनी संबंधित व्यवसायाबाबत तक्रारी व निवेदने देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र, परिस्थितीत अपेक्षित बदल झाला नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

म्हाडा कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पडोली व कोसारा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी पडोली ग्रामपंचायतीचे सरपंच विक्की लाडसे, कोसारा ग्रामपंचायतीच्या सरपंच रूतिका नरुले तसेच पडोली पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या मध्यस्थीने संबंधित टायर व्यावसायिकाकडून लेखी आश्वासन घेण्यात आले.

त्यानंतर तातडीने रस्त्यावरील व परिसरातील टायर हटविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व म्हाडा कृती समितीचे अध्यक्ष प्रफुल टोंगे व सचिव भाग्यवान गनफुले यांनी केले. “नागरिकांना त्रासदायक ठरणारे तसेच लोकवस्तीत निर्माण होणारे अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत. नागरिकांच्या हितासाठी गरज पडल्यास यापुढेही अशाच प्रकारे आंदोलन व संघर्ष केला जाईल,” असा इशारा अध्यक्ष प्रफुल टोंगे यांनी दिला.

आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर समितीने सहभागी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. रस्त्यावरील टायर हटविण्याची कार्यवाही सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये