गावात टॉवर, पण नेटवर्कचा पत्ता नाही!
सीमावर्ती गावांतील मोबाइल सेवा कोलमडली; महत्त्वाच्या कामासाठी नागरिकांची टेकडीवर धाव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- महाराष्ट्रा – तेलंगणा सीमेवरील जिवती तालुक्यातील भारी, चोपणगुडा, कामतगुडा, मच्छिगुडा, चिल्लाठिगुडा, घोडणकप्पी, सोरेकसा यासह परिसरातील अनेक गावांमध्ये मोबाइल नेटवर्कची समस्या गंभीर बनली आहे. गावाच्या हाकेच्या अंतरावर मोबाइल टॉवर उभे असतानाही सिग्नल मिळत नसल्याने नागरिकांना दैनंदिन कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाचा फोन करण्यासाठी किंवा संपर्क साधण्यासाठी नागरिकांना चक्क टेकडीवर चढावे लागत असल्याचे चित्र आहे.
शासनाकडून ग्रामीण भाग डिजिटल करण्यासाठी विविध योजना आणि उपक्रमांचा मोठा गाजावाजा केला जात असला, तरी सीमावर्ती गावांमध्ये मात्र डिजिटल सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले मोबाइल टॉवर असूनही त्याचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळत नसल्याने ‘टॉवर आहे, पण नेटवर्क नाही’ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सोरेकसा येथे बीएसएनएलचा मोबाइल टॉवर हाकेच्या अंतरावर आहे. मात्र, त्याचे नेटवर्क नियमितपणे उपलब्ध होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. एअरटेलचे नेटवर्क काही प्रमाणात मिळते; मात्र पहाडी भागात त्याची सिग्नल क्षमता अत्यंत कमकुवत आहे. त्यामुळे फोन करण्यासाठी नागरिकांना पोलिस स्टेशन परिसरातील टेकडी गाठावी लागते किंवा गावाबाहेर जाऊन नेटवर्क शोधावे लागते.
दिवसा कसेबसे संपर्क साधता येत असला, तरी रात्रीच्या वेळी ही समस्या अधिक गंभीर बनते. आजारपणाच्या प्रसंगी डॉक्टर, रुग्णवाहिका किंवा नातेवाईकांशी तातडीने संपर्क साधणेही कठीण होते. आपत्कालीन परिस्थितीत मोबाइल नेटवर्क उपलब्ध नसणे ही नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर बाब आहे.
मोबाइल नेटवर्कच्या अभावाचा फटका शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, महिला आणि नोकरदार वर्गालाही बसत आहे. ऑनलाइन शिक्षण, डिजिटल बँकिंग, ऑनलाइन व्यवहार, सरकारी योजनांची माहिती तसेच विविध शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या इंटरनेट सुविधांपासून अनेक गावांतील नागरिक वंचित आहेत.
*डिजिटल इंडियाच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह*
देशातील प्रत्येक गाव डिजिटल करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. मात्र, सीमावर्ती भागातील गावांमध्ये मूलभूत मोबाइल नेटवर्कच उपलब्ध नसल्याने ‘डिजिटल इंडिया’चा लाभ या गावांपर्यंत नेमका कधी पोहोचणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
जिवती तालुक्यातील सीमावर्ती गावांमध्ये नेटवर्कची समस्या दीर्घकाळापासून कायम असल्याने संबंधित दूरसंचार कंपन्या आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांना संपर्काच्या मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवू नये आणि अस्तित्वात असलेल्या मोबाइल टॉवरची तांत्रिक तपासणी करून नेटवर्क सेवा सुरळीत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



