शिवाजी चौकातील रस्त्याची दुरवस्था ; नागरिकांना नाहक त्रास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर : शहरातील शिवाजी चौक परिसरातील महात्मा गांधी शाळेसमोरील मुख्य रस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शिवाजी चौक हा शहरातील मुख्य बाजारपेठेकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून शाळा, महाविद्यालय, भाजी मार्केट, मंदिर, मशीद तसेच विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांकडे नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी मोठी अडचण ठरत आहे.
पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची शक्यता असून पादचाऱ्यांनाही चिखल व साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. बाजारपेठेतील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि वाहनचालक यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या गंभीर समस्येकडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजविणे, पावसाचे पाणी साचू नये यासाठी योग्य निचरा व्यवस्था करणे आणि नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
याबाबत रोहन काकडे यांनी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात व नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती केली आहे.



