महागाईच्या कचाट्यात वनमजूर; दिवसेंदिवस वाढते आर्थिक संकट, गोरगरीब कुटुंबे चिंतेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा :_ जंगल परिसरात वनमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरीब मजुरांसमोर सध्या आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि त्या तुलनेत अपुरे उत्पन्न यामुळे वनमजुरांच्या कुटुंबांना घरखर्चाचा गाडा ओढणे कठीण झाले आहे.
वनमजुरांना वर्षभर नियमित काम मिळत नसल्याने अनेक वेळा रोजगारासाठी भटकंती करावी लागते. मिळणाऱ्या मजुरीतून अन्नधान्य, भाजीपाला, घरखर्च, मुलांचे शिक्षण, कपडे, वीजबिल यांसह इतर दैनंदिन गरजा भागवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
दिवसभर कष्ट करूनही हातात शिल्लक काहीच राहत नसल्याची परिस्थिती अनेक मजुरांची झाली आहे. काम मिळाले तरच घरातील चूल पेटते, अशी अवस्था काही कुटुंबांची असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
याशिवाय पावसाळा किंवा इतर कारणांमुळे वनमजुरीची कामे बंद राहिल्यास मजुरांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होतो. त्यामुळे अशा कुटुंबांना रोजगाराची हमी, शासकीय योजनांचा लाभ आणि वेळेवर आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.
मजुरांच्या मजुरीत वाढ करण्याची मागणी
वाढत्या महागाईचा विचार करून वनमजुरांच्या मजुरीत वाढ करण्यात यावी, वर्षभर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात तसेच पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी गोरगरीब मजुरांकडून होत आहे.
महागाई वाढत असताना मजुरी मात्र मर्यादितच असल्याने वनमजुरांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री योजना न राबवता प्रत्यक्ष गरजू मजुरांपर्यंत मदत पोहोचवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



