१ किलो ४७ ग्रॅम गांजासह आरोपीला अटक
भद्रावती पोलिसांची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई करीत घराच्या छताखाली प्लास्टिक पन्नीमध्ये लपवून ठेवलेला तब्बल १ किलो ४७ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत आयुष देवानंद नरवाडे (वय २२, रा. गजानन नगर, भद्रावती) याला ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत १२ हजार रुपये असून, त्याच्याकडून सुमारे १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. त्यामुळे एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.
गोपनीय बातमीदारामार्फत भद्रावती पोलिसांना माहिती मिळाली की, आयुष नरवाडे हा आपल्या राहत्या घरी गांजा विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवत आहे. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवून कायदेशीर परवानगी घेण्यात आली. राजपत्रित अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक सचिन खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांसमक्ष संशयिताच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी घराच्या छताखाली प्लास्टिक पन्नीमध्ये लपवून ठेवलेला गांजा पोलिसांच्या निदर्शनास आला. पंचांसमक्ष त्याचे वजन करण्यात आले असता १.०४७ किलो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गांजासह मोबाईल फोन असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी एन.डी.पी.एस. कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) व २९ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. जप्त केलेला गांजा आरोपीने नेमका कुठून आणला, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती तसेच या अवैध अमली पदार्थांच्या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या दिशेने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सापोनि संजय रा. मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. कोरसे (ब.नं. २४७८), पो.हवा. विजय उपरे (ब.नं. २२८५), पो.शि./पो.कॉ. प्रेमकुमार बावनकर (ब.नं. ८१६), पो.शि. विवेक वराडकर (ब.नं. १०३६) आणि पो.शि./मो.पो.शि. करिश्मा (ब.नं. २५२३) यांच्या पथकाने केली. कारवाईदरम्यान पंच म्हणून सचिन आनंदाराव सोनटक्के (वय ३२, रा. मोहा, ता. भद्रावती) आणि यश सुनील चौधरी (वय २६, रा. जुना सुमठाणा, ता. भद्रावती) यांनी काम पाहिले.
या कारवाईमुळे भद्रावती परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारावर पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाईचा इशारा दिला असून, अशा गैरप्रकारांविरोधात पुढील तपास आणि कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



