
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
पारडी : येथील स्वस्त धान्य दुकानातील कारभाराबाबत राशनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, दुकानधारकाच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
राशन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना वेळेवर धान्य मिळत नसल्याच्या, तसेच दुकानातील व्यवहाराबाबत योग्य माहिती दिली जात नसल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहेत. शासनाकडून गरीब व गरजू नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ सुलभपणे मिळणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप होत आहे.
“राशन आमचा हक्क, मग त्रास का?” असा सवाल संतप्त राशनधारकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन स्वस्त धान्य दुकानाची तपासणी करावी, धान्य वितरणातील अनियमितता असल्यास चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाची प्रशासनाकडून तातडीने दखल घेतली जाणार का आणि राशनधारकांना दिलासा मिळणार का, याकडे पारडी येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



