अंधश्रद्धेच्या अंधारातून वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रकाशाकडे
ब्रम्हपुरीत विद्यार्थ्यांना प्रबोधनाचा धडा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी : अंधश्रद्धा ही केवळ चुकीची धारणा नसून ती माणसाच्या विवेकबुद्धीवर, विचारशक्तीवर आणि सामाजिक प्रगतीवर घाला घालणारी भयावह समस्या आहे. बुवा-बाबा, तंत्र-मंत्र, जादूटोणा, करणी आणि तथाकथित चमत्कारांच्या नावाखाली सामान्य नागरिकांची होणारी फसवणूक व मानसिक शोषण थांबविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक अत्यंत आवश्यक असल्याचा संदेश अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा ब्रम्हपुरीच्या वतीने आयोजित व्यक्तिमत्त्व विकास व वैज्ञानिक दृष्टिकोन कार्यशाळेत देण्यात आला. ब्रम्हपुरी पब्लिक स्कूल येथे आयोजित या कार्यशाळेला विद्यार्थी व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य युवा संघटक पंकज वंजारे यांनी अंधश्रद्धेच्या विविध स्वरूपांवर सखोल मार्गदर्शन केले. अंधश्रद्धा ही केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून तिच्या नावाखाली फसवणूक, आर्थिक शोषण, मानसिक गुलामगिरी आणि सामाजिक नुकसान घडवून आणले जाऊ शकते, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
तंत्र-मंत्र, चमत्कार किंवा इतर अंधश्रद्धाजन्य प्रकारांच्या माध्यमातून कोणी समाजाची दिशाभूल अथवा फसवणूक करीत असेल, तर त्याविरोधात कायदेशीर मार्गाने आवाज उठविता येतो, याबाबत माहिती त्यांनी दिली.महाराष्ट्रात अंधश्रद्धा, अमानुष व घातक प्रथांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती देताना, अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांविरोधात नागरिकांनी गप्प न बसता कायद्याचा आधार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. मानवाच्या निर्मितीपासून आजपर्यंत विविध काळात चुकीच्या समजुती, भीती आणि अज्ञानाचा आधार घेत माणसाची दिशाभूल कशा प्रकारे करण्यात आली, याचे विवेचन करत त्यांनी प्रश्न विचारणे, तर्क करणे आणि पुराव्याच्या आधारे सत्य स्वीकारणे हाच वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याचे स्पष्ट केले.अभाअंनिस, चंद्रपूरचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर तसेच जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांनी बुवाबाजी, तंत्र-मंत्र, जादूटोणा, करणी आणि तथाकथित चमत्कारांचा प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून भांडाफोड केला. डोळ्यांना दिसणारा प्रत्येक प्रकार हा चमत्कार नसतो; त्यामागे विज्ञान, मानसशास्त्र किंवा हातचलाखी असते, हे त्यांनी प्रात्यक्षिकांतून समजावून सांगितले. चमत्कारांच्या नावाखाली सामान्य नागरिकांना कशा पद्धतीने फसविले जाते, त्यांच्या भीतीचा फायदा घेतला जातो आणि त्यांना मानसिकदृष्ट्या परावलंबी बनविले जाते, याचे वास्तव उपस्थितांसमोर मांडण्यात आले.कार्यशाळेच्या दोन्ही सत्रांमध्ये विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. देवेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभाअंनिस ब्रम्हपुरी शाखेचे अध्यक्ष डॉ. खिजेंद्र गेडाम सर होते. तसेच भाऊराव राऊत आणि प्राध्यापिका शिरीन खान यांची प्रमुख उपस्थिती होती.दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी आरती भेंडारकर होत्या, तर प्राचार्या रीमा कांबळे, डॉ. योगेश बनवाडे, अनिल लोनबले, ब्रम्हपुरी तालुका संघटक डॉ. बालाजी दमकोंडवार आणि ब्रम्हपुरी तालुका शाखेचे उपाध्यक्ष डॉ. शशिकांत बांबोळे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांनंतर विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या विविध प्रश्नांना आणि शंकांना उपस्थित मार्गदर्शकांनी उत्तरे देत त्यांचे निरसन केले. त्यामुळे कार्यशाळा ही केवळ ऐकण्यापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची, चिकित्सकपणे विचार करण्याची आणि प्रत्येक गोष्टीमागील सत्य तपासण्याची दिशा देणारी ठरली.कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरल्या.
अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक समजुतींच्या पडद्याआड दडलेले वास्तव समजल्याने विचार करण्याची नवी दृष्टी मिळाली असून, आपल्या मनावर असलेला अज्ञान व अंधश्रद्धेचा पडदा दूर होऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रकाश मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती युवा शाखा, ब्रम्हपुरीचे राहुल सोनटक्के, राहुल भोयर, सुमेध वालदे, रक्षित रामटेके, ॲड. गौरव भेंडारकर, राजेश माटे आणि आदित्य बोरकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. गौरव भेंडारकर यांनी केले, सूत्रसंचालन सुमेध वालदे यांनी केले, तर आभार आदित्य बोरकर यांनी मानले.अंधश्रद्धेच्या विरोधातील लढा हा केवळ एखाद्या व्यक्तीविरोधातील संघर्ष नसून तो अज्ञान, भीती, शोषण आणि मानसिक गुलामगिरीविरोधातील सामाजिक लढा आहे. या लढ्याला बळ देण्यासाठी नव्या पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे आवश्यक आहे. त्यामुळेच या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच कार्यक्रमाची खरी फलश्रुती असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येतील उपस्थिती आणि त्यांचा सहभाग यामुळे कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाल्याचेही आयोजकांनी सांगितले.



