ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाचशे रेनकोट वाटपातून बळीराजाला मायेचे पांघरुण

रितेश वेगीनवार, अभिजित बोनगिरवार यांचा सामाजिक उपक्रम ; धानाच्या रोवणीदरम्यान शेतकरी महिला-पुरुषांना दिलासा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र वाढदिवसापुरता कार्यक्रम न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत गोंडपिपरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा विनोद राईस मिलचे संचालक रितेश वेगीनवार आणि अभिजित बोनगिरवार यांनी शेतकरी बांधवांसाठी अनोखा सामाजिक उपक्रम राबविला. मूल तालुक्यातील उथळपेठ व मामला येथील तब्बल ५०० शेतकरी महिला व पुरुषांना रेनकोटचे वाटप करून मायेचे पांघरुण घालण्यात आले.

सध्या परिसरात धानाच्या रोवणीची कामे जोमात सुरू आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत सतत पाऊस सुरू असताना शेतकऱ्यांना तसेच विशेषतः महिला शेतमजुरांना पावसाची पर्वा न करता शेतात काम करावे लागते. रोवणीच्या कामासाठी दिवसभर चिखलात व पावसात काम करणाऱ्या शेतकरी महिला-पुरुषांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांना रेनकोट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

उथळपेठ आणि मामला येथे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमादरम्यान शेतकरी महिला व पुरुषांना रेनकोटचे वितरण करण्यात आले. पावसाळ्यात शेतीची कामे करताना रेनकोटचा मोठा उपयोग होणार असून, या उपक्रमामुळे शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष कामाच्या काळात मदत मिळणार आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा व सत्काराचे आयोजन करण्याऐवजी समाजातील कष्टकरी घटकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याने परिसरातून या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे.

शेतकऱ्यांच्या कष्टाला हातभार लावणे आणि गरजेच्या वेळी त्यांच्या सोबत उभे राहणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. आगामी काळातही शेतकरी, शेतमजूर आणि गरजू नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

धानाच्या रोवणीच्या हंगामात पावसापासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने करण्यात आलेल्या ५०० रेनकोटच्या या वाटपामुळे उथळपेठ व मामला परिसरातील शेतकरी महिला-पुरुषांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये