ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायकलच्या प्रवासातून गाठणार विद्येचे मंदिर..!

विवेक गोनपल्लीवारांच्या वाढदिवसानिमित्य सायलकल वाटपातून समाजसेवा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

वाढदिवस म्हटला की उत्सव, केक आणि जल्लोष हे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, भंगाराम तळोधी येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक गोनपल्लीवार यांनी आपल्या वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करत एक वेगळा आदर्श निर्माण केला. भंगाराम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण, आशा वर्कर भगिनींचा सन्मान आणि गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करत लावलेल्या रोपांची नियमित देखभाल करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध अडचणी, आवश्यक सुविधा, रुग्णांना मिळणाऱ्या सेवा तसेच आरोग्यविषयक प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली.

ग्रामीण आरोग्यव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या आशा वर्कर भगिनींचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. गावागावातील नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचविणे, माता-बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि शासनाच्या आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आशा वर्कर करीत आहेत. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.

दरम्यान, वाढदिवसाचा आनंद अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी गरजू व गरीब कुटुंबातील दहा शाळकरी विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्या-येण्याचा प्रवास अधिक सोपा होणार असून त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीला मोठी मदत मिळणार आहे. दहा सायकलींच्या माध्यमातून दहा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना जणू नवी भरारी मिळाली आहे.

विवेक गोनपल्लीवार यांच्या या उपक्रमातून ‘निसर्गाची सेवा, आरोग्यसेवकांचा सन्मान आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात’ असा सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. वाढदिवसाचा खर्च केवळ स्वतःच्या आनंदासाठी न करता समाजातील गरजू घटकांसाठी करण्याच्या त्यांच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

“वाढदिवस साजरा करण्याचा खरा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा आपल्या आनंदातून दुसऱ्याच्या आयुष्यात थोडासा आनंद आणि आशेचा किरण निर्माण होतो,” असा भाव यावेळी व्यक्त करण्यात आला. विवेक गोनपल्लीवार यांच्या सामाजिक उपक्रमाची परिसरात सर्वत्र चर्चा असून त्यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये