ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे चंद्रपूर जिल्हा विकासाच्या वाटेवर – पालकमंत्री डॉ. उईके

स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम उत्साहात ; जलसंधारण सप्ताहामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी महिला व पुरुष आणि तरुणांसाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या नेतृत्वात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असल्यामुळे चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगीता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, सुधाकर अडबाले यांच्यासह जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, महानगरपालिका आयुक्त अकुनूरी नरेश यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती येाजनेचा निर्णय घेतला असून चंद्रपूर जिल्ह्यातील २३ हजार ५०८ शेतक-यांच्या कर्जखात्यात १७५ कोटी प्राप्त झाले आहे. महिलांना शेतक-याचा दर्जा देण्याचे विधेयक शासनाने पावसाळी अधिवेशनात पारीत केले आहे. त्यामुळे आता महिलांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण ६ हजार २० पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

जिल्ह्यात भुमी अभिलेख विभागातर्फे स्वामित्व योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण ७० हजार ९८० नागरिकांना सनद उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच १ हजार २०३ गावांचे मूळ गावठाणाचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करून २ लक्ष १२ हजार मिळकत पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत.

पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना टप्पा – २ अंतर्गत १७ हजार ७५५ घरकुल पूर्ण तर जनमन अंतर्गत २३५ घरकुल पूर्ण झाले आहे. राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, आदिम, पारधी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, मोदी आावास, यशवंतराव चव्हाण वसाहत योजना अंतर्गत एकूण ५१ हजार ३७८ घरकुल पूर्ण झाली आहेत. सन २०२६-२७ साठी चंद्रपूर जिल्ह्याचे वार्षिक पत उद्दिष्ट १० हजार कोटी आहे. पहिल्या तिमाहीतच ४ हजार ८३६ कोटींचे कर्ज वितरण झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी ९९४ कोटींचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे.

पाणलोट विकास व शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण आवश्यक आहे. त्याचे महत्व पटवून देण्यासाठी राज्यात १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जलसंधारण सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहाचा आजपासून शुभारंभ झाला, असे घोषित करून या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते मृद व जलसंधारण सप्ताह निमित्त लोगोचा शुभारंभ करण्यात आला.

पालकमंत्र्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार : अवयव दान केलेले संजय खाटीक, बबन आंबेकर, जिल्हा सामान्य रुग्णालयातील सहाय्यक परिचारिका उज्वला सोयाम, वैद्यकीय अधीक्षक मनीष सिंग, विवेक मसराम, राज्यस्तरीय शेतकरी पुरस्कार प्राप्त अरुण केदार, लीलाराम पिदुरकर, तुळशीराम मोरे, हरिश्चंद्र कोडापे यांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात यशस्वी कामगिरी करणारे सोमाक्षी गुंडावार, वृद्धी राठी, सुमिरन सहारे, संघवी हेडावू यांचा यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये