ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यशोधन विहारमधील फ्लॅटधारकांच्या हक्काचा प्रश्न ऐरणीवर

गृहकर थकबाकीचा फटका सर्वसामान्य फ्लॅटधारकांना; फेरफार नोंद, नमुना क्र. ८ व करपावतीसाठी नागरिकांचा आक्रोश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नांदा फाटा : यशोधन विहार म्हाडा प्रकल्पातील फ्लॅट खरेदी करून लाखो रुपये मोजले, ताबाही मिळाला; मात्र आजही फ्लॅटची नांदा ग्रामपंचायतीमध्ये अधिकृत नोंद, नमुना क्रमांक ८ आणि गृहकराची पावती मिळत नसल्याने फ्लॅटधारकांच्या हक्काचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसऱ्यांच्या थकीत गृहकराची शिक्षा सर्वसामान्य फ्लॅटधारकांना का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यशोधन विहार प्रकल्पाचा नांदा ग्रामपंचायतीकडे जवळपास १५ ते १७ लाख रुपयांचा गृहकर थकीत असल्याने फ्लॅटधारकांच्या फेरफार नोंदी घेण्यात आलेल्या नाहीत. परिणामी, फ्लॅट खरेदी करून ताबा मिळाल्यानंतरही नागरिकांना स्वतःच्या मालमत्तेची अधिकृत नोंद आणि आवश्यक कागदपत्रांसाठी ग्रामपंचायतीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. शैक्षणिक तसेच विविध शासकीय कामांसाठी आवश्यक कागदपत्रे मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

दरम्यान, यशोधन विहार प्रकल्पधारक पौर्णिमा श्रीवास्तव यांच्याकडील लाखो रुपयांचा गृहकर थकीत असल्याचे सांगितले जात असताना, त्याची वसुली करण्यासाठी नांदा ग्रामपंचायतीकडून ठोस कारवाई का केली जात नाही? असा थेट सवाल नांदा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अभय मुनोत यांनी उपस्थित केला आहे.

एकीकडे थकीत गृहकराची वसुली रखडलेली आणि दुसरीकडे त्याचा थेट फटका फ्लॅट खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांना—ही परिस्थिती संतापजनक असल्याची भावना फ्लॅटधारकांनी व्यक्त केली आहे. प्रकल्पधारक आणि ग्रामपंचायतीच्या आर्थिक वादात सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणे कितपत योग्य? असा सवालही आता उपस्थित होत आहे.

या प्रश्नावर फ्लॅटधारकांनी आक्रमक भूमिका घेत यशोधन विहार म्हाडा प्रकल्प कार्यालयावर मोठ्या संख्येने एकत्र येत निवेदन दिले. फ्लॅटची ग्रामपंचायत नोंद, नमुना क्रमांक ८ आणि गृहकर पावतीचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

गृहकराची थकबाकी ज्यांची जबाबदारी आहे त्यांच्याकडून वसूल करा; मात्र त्याची किंमत फ्लॅटधारकांकडून वसूल करू नका, अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी घेतली आहे. फ्लॅट खरेदीसाठी आयुष्यभराची पुंजी खर्च करूनही मालमत्तेची अधिकृत नोंद मिळत नसेल, तर ही बाब गंभीर असून संबंधित यंत्रणांनी याची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे.

आता ग्रामपंचायत आणि यशोधन विहार प्रकल्प प्रशासन थकीत गृहकराच्या प्रश्नावर काय कारवाई करते आणि फ्लॅटधारकांना त्यांच्या मालमत्तेची अधिकृत नोंद व आवश्यक कागदपत्रे कधी मिळतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अन्यथा हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता असून फ्लॅटधारकांचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ग्रामपंचायतीच्या कर प्रकल्पधारक पोर्णिमा श्रीवास्तव यांनी नांदा ग्रामपंचायतचा कर भरला नसल्याने फेरफार होऊन फ्लॅट आमच्या नावाने झाला नाही यामुळे आम्हाला मोठा मानसिक त्रास होत आहे व आमचे अनेक कामे रखडले आहेत.

 पंकज लिहितकर, फ्लॅटधारक, यशोधन विहार नांदा

थकीत कर भरण्याबाबत अनेकदा नोटीस दिली असून कर भरलेला नाही फ्लॅट धारकांनी भेट दिली असता त्यांना सांगितले थकीत कराचा भरणा केल्यानंतर फेरफार घेण्यात येईल.

नरेश धवणे, ग्राम विकास अधिकारी, नांदा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये