वरोडा पोलिस पाटलावर ४२ हजारांचा दंड ; पदावरून हकालपट्टी कधी?
५ ब्रास रेती साठवणूक प्रकरणात तहसीलदारांचा दणका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :_ कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा दुवा म्हणून काम करण्याची जबाबदारी असलेल्या वरोडा येथील पोलिस पाटील खुशाब पोडे यांच्यावर ५ ब्रास रेती साठवणूक प्रकरणात तब्बल ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राजुरा तहसीलदारांच्या आदेशामुळे हे प्रकरण समोर आले असून, या कारवाईनंतर वरोडा पोलिस पाटलाच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कायद्याचा सन्मान करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीवरच रेती साठवणुकी प्रकरणी दंडाची कारवाई होत असेल, तर पोलिस पाटील पदावर राहण्याचा नैतिक अधिकार तरी काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
पोलिस पाटील खुशाब पोडे यांच्याकडून बेकायदेशीर रेती साठवणूक तसेच वीटभट्टी व्यवसाय केला जात असल्याचा आणि आपल्या पदाचा गैरवापर करून अवैध प्रकारांना संरक्षण दिल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे आरोप चौकशीत सत्य ठरल्यास प्रशासनाने कोणतीही कुचराई न करता कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे
कोलाम आदिवासींच्या जमिनीही सोडल्या नाहीत?
यापेक्षाही गंभीर आरोप म्हणजे शासनाने आदिवासी कोलाम समाजातील गोरगरीब नागरिकांना उदरनिर्वाहासाठी दिलेल्या शेतीच्या जमिनींचा मागील २५ ते ३० वर्षांपासून कथितरीत्या वीटभट्टी व्यवसायासाठी वापर केला जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
अशिक्षित आणि गोरगरीब
आदिवासींच्या परिस्थितीचा फायदा घेत त्यांच्या जमिनींचा विनापरवानगी वापर केला जात असल्याचा आरोप असून, या प्रकारामुळे शेतीच्या जमिनींचे मोठे नुकसान होऊन त्या बंजर झाल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ज्यांच्या जमिनींचे संरक्षण व्हायला हवे, त्याच जमिनींचा गैरवापर होत असेल तर प्रशासन नेमके कोणाच्या बाजूने उभे आहे? असा सवाल आता संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.
दंड झाला, आता पदावर कारवाई कधी?
५ ब्रास रेती साठवणूक प्रकरणात ४२ हजारांचा दंड ठोठावला गेल्यानंतरही प्रशासन केवळ दंडाची कारवाई करून थांबणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिस पाटील पदाची प्रतिष्ठा आणि प्रशासनावरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास वरोडा येथील पोलिस पाटील खुशाब पोडे यांना तात्काळ पदावरून हटवावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कायद्याची जबाबदारी असलेल्या पदावर बसून जर कायद्यालाच आव्हान दिले जात असेल, तर अशा व्यक्तीला संरक्षण नव्हे, तर कठोर कारवाईची गरज आहे! प्रशासनाने आता या प्रकरणात ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा ग्रामस्थांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
वरोडा येथील पोलिस पाटील खुशाब पोडे यांच्या ५ ब्रास रेती साठवणूक प्रकरणात आदेश जारी करत ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून सदर दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी घर, शेतजमीन, फ्लॅट तसेच कुटुंबातील स्थावर मालमत्तेवर बोजा नोंद करण्यासाठी तलाठी यांना आदेश केला आहे
ओमप्रकाश गोंड, तहसीलदार राजुरा



