बेलोरा शेतशिवारात जुगार अड्ड्यावर धाड : पाच अटकेत तर दोन पसार
रोख रकमेसह २.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ बेलोरा येथील शेतशिवारात बाभळीच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांनी धाड टाकून पाच जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक केली. यावेळी दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी रोख रकमेसह चार दुचाकी व जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ६३ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई ३ ऑक्टोबर रोजी परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक अधिकारी सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांना बेलोरा शेतशिवारात मोबाईलच्या प्रकाशात पैशांची बाजी लावून जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला. यावेळी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले, तर दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये गणेश दिनेश भोयर (३१), निखील चंद्रकांत बोंडे (३५), उदय राजेंद्र वैद्य (२१), प्रणीत यशवंत मत्ते (३१) आणि अतुल गजानन कुळमेथे (३८) यांचा समावेश आहे. पसार आरोपी मनीष सातपुते आणि स्वप्नील पिदुरकर यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई भद्रावती पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस हवालदार प्रशांत शेंदरे, गोपाळ आतकुलवार, देवानंद डुकरे आणि महिला पोलीस अंमलदार मोनाली यांनी केली.



