कु. झरणा बेहेराची महाराष्ट्र राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती येथील विद्यार्थिनी कु. झरणा बेहेरा हिने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.
नागपूर विभागीय स्तरावर आयोजित १७ वर्षांखालील मुलींच्या ५८ किलो वजनगटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत कु. झरणा बेहेरा हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या दमदार कामगिरीच्या बळावर तिची महाराष्ट्र राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
झरणा हिला क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. कु. संगीता आर. बांबोडे तसेच प्रशिक्षक अमोल आवळे यांचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले.
तिच्या या यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंतराव टेमुर्डे, सचिव अमनभाऊ टेमुर्डे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
तसेच विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे, डॉ. सुधीर आष्टुनकर, प्रा. कापगते, प्रा. दाते, प्रा. बैरम, प्रा. चौधरी, प्रा. ढोके, प्रा. गेडाम, प्रा. आसूटकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कु. झरणा बेहेरा हिचे अभिनंदन करून महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
झरणाच्या या यशामुळे विवेकानंद महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही ती उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास महाविद्यालय परिवाराने व्यक्त केला.



