ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धाबा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; नागरिक दहशतीत!

वनविभागाचे उद्यापासून "ऑपरेशन बिबट" ; बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची काँग्रेसची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्रातील किरमिरी व परिसरात मागील आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू असून, शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील शेतीची कामे जोरात सुरू असताना बिबट्याच्या धुमाकुळामुळे शेतकरी, शेतमजूर आणि महिलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक दादाजी रेचनकर यांनी वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

धाबा परिसरातील किरमिरीसह दरूर, धाबा, चेक नांदगाव, हेटी नांदगाव, टोले नांदगाव, सकमूर, चेक बापूर, गोजोली मक्ता, दुबारपेठ, चिवंडा तसेच लगतच्या परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शेतकरी व शेतमजुरांना सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतात कामासाठी जावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी केवळ औपचारिक पाहणी न करता तातडीने पिंजरे व कॅमेरे बसवावेत, प्रशिक्षित वनकर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि संवेदनशील भागात वनविभागाचा गस्त वाढवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. बिबट्याचा ठावठिकाणा निश्चित होईपर्यंत संबंधित परिसरात विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

मानवी जीविताला धोका निर्माण झाल्यानंतरच प्रशासनाने जागे होण्याची वाट न पाहता, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. निवेदनकर्त्यांमध्ये तालुकाध्यक्ष अशोक रेचणकर, बाजार समिती संचालक संतोष बंडावार, नामदेव सांगडे, महेश सोनाकुलवार, प्रवीण मेश्राम, भीमराव खोब्रागडे, सोनल झाडे, नामदेव कुबडे, शंकर येलमुले यांची उपस्थिती होती.

‘अनर्थ घडल्यानंतर जागे होणार का?’
बिबट्याच्या हालचालींबाबत नागरिकांना नियमितपणे अधिकृत सूचना देण्यात याव्यात, शेतकरी व शेतमजुरांना सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे आणि परिस्थिती गंभीर असल्याने वनविभागाने तातडीने प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन हालचाल करणार का?, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वाघ _ बिबट्याचा हल्ला
मागील आठवड्यात किरमिरी परिसरात बिबट्याने हल्ला करून चार बकऱ्यांचा जीव घेतला, तर गोजोली मक्ता गावातील शेतशिवारात वाघाने बैलावर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. सोबतच जंगल क्षेत्र लागून असलेल्या चिवंडा गावातील गुराख्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले आहे.

वनविभागाचे ऑपरेशन बिबट..!
किरमिरी परिसरात असलेली बिबट ही मादी असून लहान पिल्लांची माता आहे, त्यामुळे ती जागा सोडत नाही. कॅमेऱ्याच्या माध्यमातून पीआरटीच्या सहाय्याने सध्यातरी त्या बिबट्यावर लक्ष ठेवून आहे. उद्यापासून वनविभागाकडून “ऑपरेशन बिबट” राबविण्यात येऊन, लवकरात लवकर बिबट्याच्या दहशतीतून नागरिकांना मुक्त करण्यात येईल.
                                            किशोर गौरकार, वनपरिक्षेत्र अधिकारी, धाबा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये