ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहासाचे महत्त्व व अभ्यासाची दिशा यावर अतिथी व्याख्यान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- विदर्भ महाविद्यालय, जिवती येथील इतिहास विभाग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहासाचे महत्त्व व अभ्यासाची दिशा” या विषयावर विशेष अतिथी व्याख्यान उत्साहात संपन्न झाले.

या व्याख्यानात एमपीएससी फायटर व एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अनुभव असलेले लक्ष्मण माणिक रंगवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी पीएसआय, एसटीआय व एएसओ मुख्य परीक्षांची पात्रता प्राप्त केली असून लातूर व पुणे येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

मार्गदर्शन करताना रंगवाड यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये इतिहास विषयाचे महत्त्व, अभ्यासक्रमाचे स्वरूप, स्मार्ट पद्धतीने इतिहासाचा अभ्यास, महत्त्वाच्या घटना व व्यक्तींचा कालानुक्रमाने अभ्यास तसेच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण याबाबत सविस्तर माहिती दिली. वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचे तंत्र, अभ्यासातील सातत्य आणि वेळेचे योग्य नियोजन याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.

“स्पर्धा परीक्षांची तयारी करताना केवळ अभ्यासाचे प्रमाण नव्हे, तर अभ्यासाची योग्य दिशा आणि प्रभावी रणनीती महत्त्वाची आहे,” असा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यासासाठी प्रेरित केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता यावे, त्यांना योग्य अभ्यासदिशा मिळावी आणि शासकीय सेवेत करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन एस. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रा. गुणवंत मस्कले यांच्या सहकार्याने इतिहास विभागप्रमुख डॉ. श्रीकांत डी. पानघाटे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. गणेश जी. कदम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
या अतिथी व्याख्यानाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मार्गदर्शकांच्या मौलिक मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना नवी दिशा, प्रेरणा आणि प्रभावी अभ्यासरणनीती मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये