काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी पवन भगत यांची नियुक्ती
४० वर्षांच्या सामाजिक कार्याची दखल ; राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी बल्लारपूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी ही नियुक्ती जाहीर केली असून, त्यांच्या निवडीचे काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.
पवन भगत हे गेल्या सुमारे चाळीस वर्षांपासून आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनेमध्ये सक्रियपणे कार्यरत असून त्यांनी विविध जबाबदाऱ्या आक्रमकपणे यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. संघटन बळकटीकरण, सामाजिक प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा, अनुसूचित जाती समाजाच्या हक्कांसाठी केलेले कार्य यामुळे त्यांची चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे मानले जात आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे बल्लारपूर तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती समाजाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे शासन व पक्ष संघटनेसमोर मांडले जातील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
पवन भगत यांच्या निवडीबद्दल राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, प्रदेश काँग्रेस सचिव संतोषसिंह रावत तसेच जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्याने चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावीपणे करण्याची संधी मिळाली असून, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि अनुसूचित जाती समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना पवन भगत यांनी व्यक्त केली.



