नशामुक्त युवा – विकसित भारतासाठी युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे
विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्समध्ये एसएसएस विभागातर्फे जनजागृती कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, जिवती येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ अभियानांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन २ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. ‘माय भारत’च्या समन्वयाने आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रसारण करण्यात आले.
यावेळी युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम व जबाबदार जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन करण्यात आले. देशाच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, शिक्षण, कौशल्यविकास, क्रीडा, सामाजिक सेवा आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्राध्यापक डॉ. श्रीकांत पानघाटे, डॉ. अमित बोरकर, डॉ. वैशाली डोरलीकर, डॉ. योगेश खेडेकर, डॉ. दिनेश दुर्योधन, प्रा. महेंद्र साबळे यांच्यासह एनएसएस स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय एनएसएस प्रमुख डॉ. सचिन यनगंदलवार यांनी केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी नशामुक्त समाज निर्मितीचा संकल्प घेतला. युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची गरज असल्याचे यावेळी प्रतिपादन करण्यात आले.



