ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘राठोड परिवाराचे कार्य प्रेरणादायी व दिशादर्शी’ — कमलकिशोर फुटाणे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

‘वसंतराव नाईक परसबाग’ या संकल्पनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘परसबाग असावी दारी’ या उपक्रमांतर्गत ‘वसंत योद्धा पुरस्कार’ वितरण सोहळा नुकताच नागपूर शहरात, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रांतिदिनाच्या निमित्ताने संपन्न झाला. उत्कर्ष सभागृह, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर येथे सकाळी ११ वाजता हा सोहळा पार पडला. ज्ञानप्रकाश लोकसंस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. सुभाष जाधव (संवर्ग विकास अधिकारी, पारशिवनी, जि. नागपूर) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. इंजि. आत्मारामजी चव्हाण (नायक, नागपूर नगरी) होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. अॅड. बद्रीप्रसाद चव्हाण (कारभारी, नागपूर नगरी) उपस्थित होते.

मा. कमलकिशोर फुटाणे साहेब (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., नागपूर) यांच्या शुभहस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानप्रकाश लोकसंस्थेचे श्रीपत राठोड यांनी केले.

कार्यक्रमात विविध क्षेत्रांत नेत्रदीपक, समाजोपयोगी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक जिल्ह्यांतील मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्राचार्य प्रा. राम गावंडे (कृषी महाविद्यालय, नागपूर व प्रमुख योग प्रशिक्षक) तसेच मा. सचिन सूर्यवंशी (संवर्ग विकास अधिकारी, काटोल) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी पारंपरिक बंजारा (गोरमाटी) भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे मा. ह.भ.प. बंडू रामदास राठोड उर्फ बंडू महाराज दापकेकर (मुंबई) यांचा प्रमुख मानकरी म्हणून गौरव करण्यात आला.

तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना त्यांच्या कार्यानुसार विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये मा. उमेश पवार सर यांना ‘चालते, बोलते आणि कर्ते विद्यापीठ’, मा. संजय राजुळे (लातूर) यांना ‘आपले आरोग्य – आपली जबाबदारी’, मा. सुदाम राठोड (जिवती, चंद्रपूर) यांना ‘सर्वसामान्यांसाठी अविरत संघर्ष’, तर मा. दिपक घोगरे (मूल, चंद्रपूर) यांना ‘प्रयोगशील, प्रगतिशील, उद्यमशील शेतकरी’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

सन्मान सोहळ्यापूर्वी सर्व मान्यवरांच्या कार्यावर आधारित चित्रफिती दाखविण्यात आल्या. त्यानंतर मान्यवरांचे मनोगत व मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी श्रीपत राठोड यांनी लिखित परसबाग निर्माण गीताचे भिंतीपत्र व संगीतबद्ध गीताचे प्रकाशन करण्यात आले.कु.अंजली राठोड व कु. दिपाली राठोड यांनी हिंदी व इंग्रजी भाषेत भाषणे केली.

याप्रसंगी ‘राठोड परिवाराचे कार्य प्रेरणादायी व दिशादर्शी आहे,’ असे मा. कमलकिशोर फुटाणे यांनी आवर्जून प्रतिपादन केले. तसेच आपल्या अधिकारक्षेत्रात या परिवाराला निश्चितपणे सहकार्य केले जाईल,असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहू न शकलेले राज्यस्तरीय शिक्षक नेते मा. चंद्रकांत दामेकर,जाहूर, जि. नांदेड तसेच मा. कॅप्टन डॉ. एल. बी.कलंत्री, मा. संचालक, रेशीम, महाराष्ट्र राज्य यांचे ध्वनीसंदेश उपस्थितांना ऐकविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानप्रकाश लोकसंस्थेच्या सौ. जयश्रीताई राठोड यांनी समर्पकपणे करून उपस्थितांची मने जिंकली. दिपाली राठोड यांच्या तांत्रिक कौशल्याचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

शेवटी खरबीचे नायक व सामाजिक कार्यकर्ते पिरुसिंग राठोड यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला नागपूर तसेच विविध क्षेत्रांतील बुद्धिजीवींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये