“स्वच्छ सेवा आकलन” उपक्रमातून ग्रामपंचायतींचे स्वयं_मूल्यांकन
ग्रामसभेतून प्रक्रिया पूर्ण करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा_२ अंतर्गत ग्रामीण भागातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि शाश्वत करण्यासाठी “स्वच्छ सेवा आकलन” उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे वार्षिक डिजिटल मूल्यांकन करण्यात येणार असून, ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छता सेवांची सद्यस्थिती आणि कार्यक्षमता तपासली जाणार आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी निर्धारित कालावधीत स्वयं_मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे.
“स्वच्छ सेवा आकलन”मध्ये स्वच्छतेच्या स्थितीची शाश्वतता, घन व द्रव कचरा व्यवस्थापन, दृश्य स्वच्छता, घन व द्रव कचरा व्यवस्थापनाच्या साधनांचे कार्यान्वयन व देखभाल तसेच सामुदायिक स्वच्छता संकुलाचे कार्यान्वयन व देखभाल आदी प्रमुख बाबींचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. ग्रामपाणी व स्वच्छता समिती तसेच स्थानिक समुदायाच्या सहभागातून प्रमाणित प्रश्नावलीच्या आधारे स्वयं_मूल्यांकन केले जाणार आहे. या माध्यमातून गावात स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी “स्वच्छ सेवा आकलन” अंतर्गत स्वयं_मूल्यांकनाची प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग आणि जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक मच्छिंद्रनाथ धस यांनी केले आहे.
*ग्रामपंचायतींची भूमिका महत्वाची*
“स्वच्छ सेवा आकलन”च्या प्रक्रियेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतींच्या लॉगिनमधून ई_ग्रामस्वराज पोर्टलवर ओडीएफ प्लस (मॉडेल) ग्रामपंचायतींची प्रारंभिक माहिती भरावयाची आहे. त्यानंतर ही माहिती ग्रामसभेसमोर चर्चेसाठी व पडताळणीसाठी ठेऊन आवश्यक ठरावद्वारे मान्यता घेण्यात येणार आहे. ग्रामसभेनंतर आवश्यक सुधारणा करून अंतिम माहिती पोर्टलवर सादर करावी लागणार आहे.
*२ ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा*
“स्वच्छ सेवा आकलन”च्या तिसऱ्या टप्प्यात १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ग्रामपंचायतींचे स्वयं_मूल्यांकन करण्यात येणार आहे. स्वयं_मूल्यांकनानंतर प्रारूप अहवाल तयार करून २ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत अहवालावर चर्चा करून माहितीची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर आवश्यक सुधारणा करून अंतिम माहिती पोर्टलवर सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
“स्वच्छ सेवा आकलन”च्या माध्यमातून ग्रामपंचायतींना आपल्या गावातील स्वच्छता व्यवस्थेचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्याची संधी मिळणार आहे. ग्रामसभेच्या सहभागातून माहितीची पडताळणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्यावर भर द्यावा. सर्व ग्रामपंचायतींनी स्वयं_मूल्यांकनाची प्रक्रिया वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करावी.
*_पुलकित सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर*



