लोहारात १० जानेवारीला गोल्ला, गोलकर समाजाचा राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळावा
समाजभवनाचे लोकार्पण; _गुणवंत विद्यार्थी, पुरस्कारप्राप्त व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
चंद्रपूर :_ गोल्ला, गोलकर समाजाच्या सामाजिक एकजुटीला बळ देण्यासोबतच विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य जोडीदार निवडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लोहारा येथे १० जानेवारी २०२७ रोजी राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी समाजाच्या स्वप्नातील नूतन समाजभवनाचा लोकार्पण सोहळाही उत्साहात पार पडणार आहे. गोल्ला, गोलकर समाज संघटना, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
*समाजभवनाचे स्वप्न साकार*
गोल्ला, गोलकर समाजबांधवांच्या एकजुटीच्या प्रयत्नातून लोहारा येथे समाजभवनाची उभारणी करण्यात आली आहे. समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या समाजभवनाचे लोकार्पण १० जानेवारी रोजी होणार आहे. समाजाच्या सामूहिक प्रयत्नांचे हे महत्त्वपूर्ण फलित असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.
*राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन*
विवाहयोग्य युवक-युवती आणि त्यांच्या पालकांना एकाच व्यासपीठावर आणून विवाह जुळविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना आपला परिचय करून देण्याची आणि योग्य जीवनसाथी निवडण्याची संधी मिळणार आहे.
*विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा होणार सन्मान*
या कार्यक्रमात समाजातील गुणवंत, कर्तृत्ववान आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. इयत्ता दहावी व बारावीमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पुरस्कारप्राप्त व विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या मान्यवरांचा सन्मान, शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार.
विविध निवडणुकांमध्ये विजय मिळविणाऱ्या समाजबांधवांचा गौरव करण्यात येणार आहे.
*२५ डिसेंबरपर्यंत नावनोंदणीचे आवाहन*
या मेळाव्यासाठी इच्छुक उपवर-वधू, गुणवंत विद्यार्थी, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी २५ डिसेंबर २०२६ पर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नावनोंदणीसाठी उपवर-वधू नोंदणी, गुणवंत विद्यार्थी, पुरस्कारप्राप्त मान्यवर, सेवानिवृत्त कर्मचारी आणि नवनिर्वाचित समाजबांधव अशा स्वतंत्र संपर्कव्यवस्था करण्यात आल्या आहेत.
*समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडविणारा उपक्रम*
समाजभवन लोकार्पण आणि राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळावा या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, शैक्षणिक प्रोत्साहन आणि विवाहविषयक समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्याच्या विविध भागांतील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याला सहकार्य करावे, असे आवाहन गोल्ला, गोलकर समाज संघटना, जिल्हा चंद्रपूर आणि आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



