दिवाळीच्या स्नेहभेटीतून कोरपन्यात काँग्रेसचा जनसंपर्क मजबूत
सुभाषभाऊ धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तरुणांचा पक्षप्रवेश.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना — दिवाळी सणानिमित्त जनतेशी संवाद साधत काँग्रेस संघटनेला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी कोरपना तालुक्यातील पिंपळगाव, वडगाव, कढोली यांसह विविध गावांना सदिच्छा भेटी देत नागरिक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या स्नेहभेटीदरम्यान सुभाषभाऊ धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत अनेक तरुणांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे या दौऱ्याला सणासुदीच्या शुभेच्छांसोबतच संघटनात्मक बळकटीची जोड मिळाली. दिवाळीच्या आनंदात जनतेशी आपुलकीचे नाते अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने झालेल्या या दौऱ्यात सुभाषभाऊ धोटे यांनी नागरिकांच्या ख्यालीखुशालीची विचारपूस करून स्थानिक समस्या व विविध प्रश्न जाणून घेतले. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्ष सातत्याने संघर्ष करीत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पिंपळगाव येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाची पाहणी करून त्यांनी आयोजकांना यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका, मतदार यादी पुनरावलोकनाची SIR प्रक्रिया आणि स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील विविध राजकीय व सामाजिक विषयांवर कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी त्यांनी सांगितले की, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात लोकशाही, संविधान आणि जनतेच्या हक्कांच्या संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडी देशभरात संघर्ष करीत असल्याचे नमूद करीत, हा लढा अधिक व्यापक करण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पातळीवर सक्रिय व्हावे, जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने काम करावे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना गावागावांत अधिक मजबूत करावी, असे आवाहन सुभाषभाऊ धोटे यांनी केले. त्यांच्या विचारांनी व नेतृत्वावर व्यक्त केलेल्या विश्वासातून अनेक तरुणांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नवप्रवेशित तरुणांचे काँग्रेस पक्षाचा दुपट्टा प्रदान करून उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर, युवक काँग्रेसचे शैलेश लोखंडे, वडगावचे उपसरपंच सुदर्शन डवरे, ग्रामपंचायत सदस्य कैलास मेश्राम, शामकांत निखाडे, कढोलीचे ग्रामपंचायत सदस्य दत्ता पा. मसे, कढोली सोसायटीचे अध्यक्ष विजय बोंडे, दत्ता उपरे, शामराव केळझरकर, राजकुमार पानघाटे, रमेश लोंनबले, माजी सरपंच रेखा गोडाम, अरविंद जोगी यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



