धाबा संतनगरीत कोंडय्या नामाचा गजर!
भजन मंडळांनी पालखी सोहळ्यात आणली रंगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तेलंगाना, आंध्र प्रदेश आणि विदर्भातील भाविकांचे आराध्य दैवत श्री संत परमहंस कोंडया महाराज धाबा यांच्या कार्तिक शुद्ध तृतीयेच्या पर्वावरील पुण्यतिथी महोत्सवा निमित्त धाबा नगरीत कोंडय्या नामाचा गजर दुमदुमला तर भजन मंडळींनी पालखी सोहळ्यात रंगत भरली.
पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त १२ नोव्हेंबरला पहाटे पाच वाजता माजी कोषाध्यक्ष अशोकराव भस्की यांनी समाज प्रबोधनपर धार्मिक प्रवचन केले. त्यानंतर महाराजांचे चरित्रावर आधारित “कोंडय्या विजय ग्रंथा”चे वाचन करण्यात आले. आजचे अन्नदाते नंदकिशोर गजानन तुंडूरवार व नलिनी तुंडूरवार धाबा, रीना व मोनीश नंदुरकर, राजुरा या दाम्पत्यांनी समाधी महापूजा केली. पुरोहित्याचे काम पुजारी तुलसी रामेश्वर सेगमवार महाराज, अरुणाताई आंबेदवार व सहकाऱ्यांनी केले. मठाच्या वारसान पुजारी अरुणाताई आंबेदवार यांच्या घरात विधिवत पूजा करून पुष्पाने सजवलेल्या पालखीत प्रस्थापित करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्ष सुहास माडुरवार, सचिव राजू चिलमंतवार, उपाध्यक्ष विजय देशमुख, माजी अध्यक्ष बबनराव पत्तीवार, माजी सचिव सचिन फुलझेले, माजी कोषाध्यक्ष स्वप्नील अनमुलवार,विद्यमान विश्वस्त सर्वश्री अशोक रेचणकर, अनिल कोरडे, महेश सोनाकुलवार यांची उपस्थिती होती.
त्यानंतर महाराजांची पालखी मंदिराच्या गाभाऱ्यातून धाबा संत नगरीच्या मुख्य मार्गाने प्रदक्षिणे करता काढण्यात आली. वीस भजन मंडळांनी व नारायण पेठकर आणि सहकाऱ्यांच्या लेझीम पथकाने पालखीत सहभाग घेतला. भजन मंडळात सहभागी महिला पुरुष ” कोंडय्या महाराज की जय” असे नामस्मरण करत दंग होऊन वारकरी भजनाच्या ठेक्यावर नाचले. गावातील प्रमुख मार्गाने विविध सामाजिक मंडळांकडून पालखीत सहभागी भाविकांचा सन्मान करण्यात आला व अल्पोप आहाराचे वितरण करण्यात आले.
समारोपाकरिता पालखी सहा वाजता मंदिरात परत आणण्यात आली. महाराजांच्या आरतीने पालखीचा समारोप करण्यात आला. नलिनी व नंदकिशोर गजाननराव तुंडूरवार यांचेकडून उपस्थित भाविक भक्तांना अन्नदान करण्यात आले. सायंकाळी सोनापुर देशपांडे येथील महिला मंडळाने हरिपाठाचे सादरीकरण केले.



