भाऊबीजेच्या दिवशी आ. सुधीर मुनगंटीवार यांची घाटकुळला अनमोल भेट; विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंता मिटली!
विद्यार्थ्यांच्या मागणीची आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली तत्काळ दखल

चांदा ब्लास्ट
गोंडपिपरी-घाटकुळ-येनापूर-चामोर्शी मार्गावर बससेवा सुरू; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठा दिलासा
चंद्रपूर :- पोंभूर्णा तालुक्यातील घाटकुळ येथील विद्यार्थ्यांना बस पकडण्यासाठी दररोज तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. ही अडचण लक्षात घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बससेवा सुरू करण्यासाठी तातडीने पुढाकार घेतला. माजी उपसभापती विनोद देशमुख आणि गावातील विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे ही मागणी मांडताच त्यांनी संबंधित परिवहन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यांच्या या पुढाकारातून अखेर गोंडपिपरी-घाटकुळ-येनापूर-चामोर्शी मार्गावर बससेवा सुरू झाली. विशेष म्हणजे, दीपावलीच्या आनंदात भाऊबीजेच्या दिवशी ही सेवा सुरू झाल्याने घाटकुळवासीयांसाठी हा आनंदाचा दुहेरी क्षण ठरला आहे. विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार असून, त्यांच्या शाळा-महाविद्यालयापर्यंतचा प्रवास आता अधिक सुलभ होणार आहे.
गोंडपिपरी-घाटकुळ-येनापूर-चामोर्शी या मार्गावर बससेवा उपलब्ध नसल्याने गावातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बस पकडण्यासाठी विद्यार्थ्यांना तब्बल तीन किलोमीटर पायी जावे लागत होते. अनेकदा वेळेत बस न मिळाल्याने शाळा-महाविद्यालयात पोहोचणे कठीण होत होते. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा प्रश्न अधिक गंभीर बनला होता. सामान्य प्रवाशांनाही या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.ही समस्या लक्षात घेऊन माजी उपसभापती विनोद देशमुख आणि गावातील विद्यार्थ्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत संपर्क साधला. विद्यार्थ्यांनी मांडलेली व्यथा ऐकताच त्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली. केवळ आश्वासन देऊन न थांबता, आपल्या स्वीय सहायकांसह विद्यार्थ्यांना विभागीय परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे पाठवून संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या. या मार्गावर लवकरात लवकर बससेवा सुरू करण्याबाबत आ.मुनगंटीवार यांनी परिवहन विभागाला स्पष्ट निर्देश दिले.
परिवहन विभागानेही या मागणीची दखल घेत आवश्यक कार्यवाही केली आणि अखेर भाऊबीजेच्या शुभदिनी या मार्गावर बससेवा सुरू झाली. त्यामुळे घाटकुळच्या विद्यार्थ्यांची दररोजची तीन किलोमीटरची पायपीट थांबणार असून, शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी त्यांना आता अधिक सुलभ आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. विशेषतः विद्यार्थिनींची होणारी गैरसोय दूर होऊन त्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच घाटकुळ आणि परिसरातील नागरिकांनाही या बससेवेचा लाभ होणार असून, दैनंदिन प्रवासासाठी मोठी सोय उपलब्ध झाली आहे. भाऊबीजेच्या दिवशी मिळालेली ही सुविधा ग्रामस्थांसाठी आनंदाची आणि दिलासादायक ठरली आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी निगडित प्रश्न असो, ग्रामीण भागातील दळणवळणाची समस्या असो किंवा सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी असोत, त्या सोडविण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची कार्यपद्धती या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.



