होली फॅमिली कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
होली फॅमिली कॉन्व्हेंट स्कूल, ठुथरा, गडचांदूर येथे नवनिर्वाचित विद्यार्थी परिषदेचा भव्य पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि अभिमानाने संपन्न झाला. या समारंभातून नवनिर्वाचित विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांचा औपचारिक पदग्रहण सोहळा पार पडला तसेच नेतृत्व, जबाबदारी आणि सेवाभाव या मूल्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. नवनियुक्त स्कूल पीपल लीडर विनय साई पात्रा, असिस्टंट स्कूल पीपल लीडर नमन तेरे, हाऊस कॅप्टन, उपकॅप्टन तसेच इतर विद्यार्थी नेत्यांना पदचिन्हे व सॅश प्रदान करून त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला.
शपथविधी हा समारंभाचा मुख्य आकर्षण ठरला. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर दीपा यांनी नवनियुक्त विद्यार्थी नेत्यांनी प्रामाणिकपणे, शिस्तीने, निष्ठेने आणि समर्पणाने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची शपथ दिली. मुख्याध्यापकांनी नवनिर्वाचित विद्यार्थी परिषदेचे अभिनंदन करून त्यांना आपल्या आचरणातून इतरांसमोर आदर्श निर्माण करण्याचे आणि जबाबदार नेतृत्व करण्याचे आवाहन केले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची प्रेरणादायी सांगता झाली. या संस्मरणीय समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली.



