ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ; सिंदखेडराजा मतदारसंघाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश

वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा, शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मानले आभार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, चिखली आणि लोणार तालुक्यात यंदा पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत मतदारसंघ दुष्काळग्रस्त घोषित करण्याची जोरदार मागणी केली होती. अखेर शासनाने या पाठपुराव्याची दखल घेत सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दुष्काळी परिस्थिती गंभीर होताच डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सर्वप्रथम उपविभागीय महसूल अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून देऊळगाव राजा तालुक्यासह संपूर्ण सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपलेल्या पिकांची पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासनापुढे वस्तुस्थिती मांडली.

यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या जिल्हा दौऱ्यावेळी डॉ. खेडेकर यांनी सविस्तर निवेदन सादर करून हेक्टरी ₹५० हजार आर्थिक मदत, पीक विम्याची तातडीने नुकसानभरपाई, दुष्काळी सवलती लागू करणे आणि सिंदखेडराजा मतदारसंघ दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली होती. तसेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्याकडेही स्वतंत्रपणे निवेदन देऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.

डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची शासनाने सकारात्मक दखल घेत अखेर सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला. या निर्णयामुळे मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी सवलती, मदत आणि इतर योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयाबद्दल माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रा पवार यांचे आभार मानले. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात येणारी आर्थिक मदत, पीक विम्याची नुकसानभरपाई आणि इतर दुष्काळी सवलती दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्य खात्यात जमा व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

डॉ. खेडेकर म्हणाले, “दुष्काळग्रस्त घोषित होणे हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा पहिला टप्पा आहे. आता शासनाने जाहीर होणारी मदत आणि सर्व सवलती कोणताही विलंब न करता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. शेतकऱ्यांच्या हितासाठी माझा पाठपुरावा यापुढेही कायम राहील.”

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये