ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुष्काळग्रस्त यादीतून जिवती तालुक्याला वगळले!

शासनाच्या निर्णयाविरुद्ध संताप ; शेतकऱ्यांकडून फेरसर्वेक्षणाची जोरदार मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- यंदाच्या हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायावर गंभीर परिणाम झाला असताना शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जिवती तालुक्याचा समावेश नसल्याने तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतशिवारात दुष्काळाच्या झळा जाणवत असताना सरकारी यादीत तालुक्याला स्थान न मिळाल्याने प्रशासनाच्या दुष्काळ निर्धारणाच्या निकषांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

राज्यातील २६५ तालुके कृषी उपायुक्तांच्या अहवालानुसार दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले. मात्र अतिदुर्गम भागातील जिवती तालुक्याला या यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे. पावसाचे प्रमाण आणि त्यातील खंडामुळे अनेक भागांत पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असतानाही तालुक्याला वगळण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

               दुष्काळाची तीव्रता ठरविताना केवळ कागदोपत्री आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष गावागावातील परिस्थितीची पाहणी करणे गरजेचे आहे, असे शेतकरी व ग्रामस्थ सांगत आहेत. पिकांची स्थिती, पावसातील खंड, उपलब्ध पाणीसाठा आणि झालेले नुकसान यांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन जिवती तालुक्याचे फेरसर्वेक्षण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाकडून विविध सवलती व मदत मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे यादीत समावेश न झाल्यास संकटग्रस्त शेतकरी संभाव्य मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील वस्तुस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पथके पाठवून प्रत्यक्ष पाहणी करावी, पिकांची स्थिती आणि पर्जन्यमानाचा फेरआढावा घेऊन शासनाकडे सुधारित अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. “कागदावरील आकडेवारीपेक्षा शेतकऱ्यांच्या शेतातील वास्तव महत्त्वाचे आहे. जिवती तालुक्यातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून फेरसर्वेक्षण करण्यात यावे आणि पात्रता असल्यास दुष्काळग्रस्त यादीत जिवतीचा समावेश करावा,” अशी स्पष्ट मागणी नागरिकांकडून होत आहे.दुष्काळाच्या संकटात शेतकरी अडकले असताना जिवती दुष्काळग्रस्त यादीबाहेर का? हा प्रश्न सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रशासन आणि शासन याबाबत तातडीने कोणती भूमिका घेते, याकडे शेतकरी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे

जिवतीला वगळले तरी का? निकष जाहीर करण्याची मागणी

चंद्रपूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होत असताना जिवती तालुका कोणत्या निकषांमुळे यादीबाहेर राहिला, याची प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, कागदावरील आकडेवारीसोबतच शेतशिवारातील वस्तुस्थिती तपासली पाहिजे. जिवती तालुक्यातील पर्जन्यमान, पिकांची स्थिती आणि शेतीवरील परिणामांचा प्रत्यक्ष फेरआढावा घेऊन तालुका पात्र ठरत असल्यास सुधारित प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा.

                                   ° संतोष इंद्राळे जिवती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये