धाबा केंद्राचे शैक्षणिक संमेलन तथा शिक्षण परिषद संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत धाबा केंद्राचे प्रथम शैक्षणिक केंद्र संमेलन तथा शिक्षण परिषद केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोजोली मक्ता येथे संपन्न झाली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुनील सोनुले यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून धाबा केंद्राचे केंद्रप्रमुख शेखर मेश्राम , संतोष कळते मुख्याध्यापक सतीश बावणे, मुख्याध्यापक मुरलीधर सरकार, रमेश भिले, नितीन चापले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या शिक्षण परिषदेत पायाभूत चाचणी पूर्वतयारी, विविध वेबसाईटवरील साहित्याची ओळख तथा उपयुक्तता, गुणवत्ताधारित स्पर्धा परीक्षा, नवोदय अभ्यासक्रम, एक वर्ग व बहु वर्ग अध्यापन पद्धती इत्यादी विषयाबद्दल प्रभाकर अवसरे, स्वप्निल कापडे, पंकज गेडाम, महेश आलेटीवार, खुशाब बारसागडे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका साधना उराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक मुरलीधर सरकार यांनी केले. यावेळी धाबा केंद्रांतर्गत सर्व शिक्षकवृंदांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.



