मासेमारीसाठी गेलेला इसम बेपत्ता, अजूनही शोध सुरु
नवेगाव - कोरंबी परिसरातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथील कैलास मेश्राम (वय ४५ वर्षे) हे गुरुवार (दि. ३० जुलै) सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास मासेमारीसाठी नवेगाव–कोरंबी शेत परिसरातून वाहणाऱ्या नाल्यावर गेले होते. मात्र बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन शोध घेतला.
यावेळी घटनास्थळी कैलास मेश्राम यांची दुचाकी, चप्पल दिसून आली. तसेच मासेमारीसाठी वापरण्यात येणारे हातपेलणी पाण्यात पडलेली आढळून आली. दरम्यान कैलास मेश्राम यांचा कोणताही मागमूस लागला नाही. सततच्या पावसामुळे संबंधित नाला तुडुंब भरून वाहत असून, पाण्याच्या तीव्र प्रवाहात ते वाहून गेले असावेत, असा अंदाज प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिस व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली आहे. पाण्याचा वेग अधिक आणि कचरा असल्याने शोधकार्यात अडचणी येत असल्याची माहिती आहे. कालपासून आजपर्यंत अजूनही शोध मोहीम सुरूच आहे.
दरम्यान, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदी, नाले व पूरग्रस्त भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



